उन्हाळा सुरु झाला की, बाजारात सर्वत्र आंबे पाहायला मिळतात. आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल ज्याला आंबा खायला आवडत नाही. हे फळ चवीला अगदी गोड आणि रसाळ असते. त्याच्या सुगंधामुळे खाण्याची इच्छा अधिक तीव्र होत जाते. याच्या गोड चवीमुळे मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का असा प्रश्न पडतो.
आंबा हा अनेक पोषकतत्वांनी भरलेले फळ आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, अमीनो आम्ल, लिपिड्स आणि फायबर असतात. आंब्याच्या फळात कोलेस्टेरॉल नसते. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्त्वे अ आणि यांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो १०० ग्रॅम आंबा खाल्ल्याने ६० ते ९० कॅलरीज मिळतात. तसेच यामध्ये ७५ ते ८५ टक्के पाणी असते.
आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि चरबीचे प्रमाण कमी असते. याशिवाय हृदयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून आपले रक्षण करते. आपण योग्य प्रमाणात आंबा खाल्ला तर त्यात असलेले फायबर पचन सुधारते. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा कमी प्रमाणात खावा. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५१ आहे. फळांचा गोडवा यात असल्यामुळे फ्रुक्टोज आढळते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. आंबा हा बटाटे, कडधान्य,तळलेले पदार्थ आणि उच्च कार्बयुक्त पदार्थांसोबत खाणे टाळायला हवे.
ग्लायसेमिक इंडेक्सनुसार अननस, टरबूज, बटाटे आणि ब्रेड यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ७० पेक्षा जास्त असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. डॉक्टर सांगतात की, ज्याच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित आहे, पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी आंबा खाणे टाळावे.
डॉक्टर म्हणतात की, सकाळी फिरायला जाताना, व्यायाम केल्यानंतर आणि जेवणाच्या आधी फळे खाणे चांगले असते. जेवणासोबत आंब्याचे सॅलड देखील आपण खाऊ शकतो. जेवणाच्या वेळी आंबा खाणे चांगले कारण यावेळी रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढत नाही. जेवणानंतर आंबा कधीही खाऊ नये. त्यामुळे रक्तातील साखर वाढते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
