माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील–चाकूरकर यांचे निधन; लातूरसह राज्यात शोककळा

by Team Satara Today | published on : 12 December 2025


लातूर  :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (वय ९०) यांचे आज पहाटे लातूर येथील निवासस्थानी निधन झाले. काही महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ असलेल्या पाटील यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाने लातूरसह राज्यातील राजकीय विश्वावर दुःखाची छाया पसरली आहे.

शिवराज पाटील यांच्या घराबाहेर सकाळपासूनच स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय मान्यवरांची गर्दी झाली असून वातावरण शोकाकुल झाले आहे. लातूरच्या चाकूर गावातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या पाटील यांनी आपल्या सौम्य स्वभाव, नेमक्या कामकाजाची पद्धत आणि शिस्तबद्ध नेतृत्वामुळे राज्य आणि केंद्राच्या राजकारणात भक्कम स्थान मिळवले.कायदेमंडळातील त्यांच्या शिस्तबद्ध कामकाजाची देशभरात दखल घेतली गेली. पाटील हे स्वच्छ प्रतिमा आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जात.२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर टीका होताच पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजनीतिक आयुष्यातील हा निर्णय विशेष ठळक मानला जातो.

शिवराज पाटील यांच्या निधनावर राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.“सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि शांत स्वभावाचा नेता गेला,” अशा भावपूर्ण प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

१९८० मध्ये प्रथम लोकसभा सदस्य म्हणून निवड

तब्बल सात वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व

१९९१–९६ : लोकसभा सभापती (स्पीकर)

२००४–०८ : केंद्रीय गृहमंत्री

२०१०–१५ : पंजाब राज्यपाल व चंदीगड प्रशासक


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बंदी असलेल्या गुटख्याची जिल्ह्यात राजरोसपणे विक्री
पुढील बातमी
सांडवली रस्त्यावरील दोन पुलांसाठी ९ कोटी ६६ लाख; ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; दळणवळण सुरक्षित आणि सुकर होणार

संबंधित बातम्या