मुन्नाभाईमधील अभिनेत्री ग्रेसी सिंग ब्रह्माकुमारी अध्यात्मिक केंद्रात एक तप

by Team Satara Today | published on : 18 October 2025


‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘अरमान’ आणि ‘गंगाजल’ या चित्रपटांमधील भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ग्रेसी सिंगने 1997 साली टीव्ही मालिका ‘अमानत’ मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये संजय दत्तची हिरोईन असलेल्या ग्रेसीच्या निरागस चेहऱ्याने आणि मोहक हास्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.‘लगान’मधील गौरी आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील डॉ. सुमन अस्थाना उर्फ चिंकी या भूमिकांनी ती सर्वांची लाडकी बनली. अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचीही खूप चर्चा झाली. आज 22 वर्षांनंतरही तिच्या चेहऱ्यावर तीच निरागसता कायम दिसते. 

2008 मध्ये आपल्या मॅनेजरच्या निधनानंतर ग्रेसी सिंगने बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटांपासून थोडं अंतर ठेवलं. तिने केवळ स्वतःच्या मनाला भावणारे आणि अर्थपूर्ण प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये ती ब्रह्माकुमारी या अध्यात्मिक संस्थेशी जोडली गेली आणि त्यानंतर तिने अभिनयापेक्षा आत्मिक शांततेचा मार्ग निवडला. ग्रेसीने पुढे दिग्दर्शन आणि लेखनाचीही आवड व्यक्त केली आहे, मात्र प्रसिद्धीपेक्षा तिला वैयक्तिक समाधान आणि आत्मविकास अधिक महत्त्वाचा वाटतो. 

ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडल्यापासून ग्रेसी सिंगने पूर्णपणे अध्यात्मिक जीवन स्वीकारलं आहे. ध्यान, सेवा आणि योगाद्वारे ती शांतता आणि समाधान शोधत आहे. या परिवर्तनाचं प्रतिबिंब तिच्या ‘संतोषी माँ’या मालिकेत दिसलं, ज्यात तिने देवी संतोषीची भूमिका साकारली होती. एका बॉलिवूड अभिनेत्रीपासून एक साधक बनण्याचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.लगानमधल्या भूमिकेमुळे ग्रेसी सिंहला रातोरात ओळख मिळाली. याशिवाय ग्रेसी सिंह लगाननंतर मुन्नाभाई एमबीबीएस आणि गंगाजलमध्येही दिसून आली. या दोन्ही चित्रपटांमध्ये ग्रेसी सिंहनं मोलाची भूमिका निभावली. अल्पावधीच बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींमध्ये ग्रेसी सिंहच्या नावाचा समावेश होऊ लागला. पण, आता अभिनेत्रीनं ग्लॅमरस जग आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेलं करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला.  

जरी ग्रेसी आता चित्रपटांपासून दूर आहे, तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या दैनंदिन जीवनातील झलक, फोटो आणि विचार ती इंस्टाग्रामवर शेअर करते. तिच्या निरागसतेची आणि साधेपणाची चाहत्यांमध्ये आजही क्रेझ आहे. इंस्टाग्रामवर तिचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गरीब-रथ एक्सप्रेसला भीषण आग
पुढील बातमी
दिवाळीत काचेसारखी नितळ त्वचेकरीता ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 सोप्या टिप्स

संबंधित बातम्या