जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांची मागणी

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यापूर्वी संघटनेकडून कराड येथील राजेश शिंदे व डॉ. पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्याकडून संबंधित डॉ. राजेश शिंदे व डॉ. पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात आढळलेल्या त्रुटी तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्ट च्या मान्यतेखाली राजेरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. परंतु डॉ. करपे यांच्याकडून कोणतीही शहानिशा न करता अथवा जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून त्याठिकाणी पडताळणी करुन कोणतीही चौकशी न करता पैशाच्या देवाण-घेवाणी मधून पुन्हा डॉ. राजेश शिंदे यांना मान्यता देण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच डॉ. युवराज करपे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघटनेकडून बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देताना संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला, शेतकरी संघटनेचे व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, सामाजिक कार्यकर्त्या विद्या मोरे हे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीच्या विनयभंग प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
जागतिक योग दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी योग सोपान वर्ग

संबंधित बातम्या