सातारा : सातारा शहरात कार्यरत असलेल्या सुरज रेळेकर या पोलीस हवालदाराकडून नाहक रिक्षा चालकांना त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने, आज बुधवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच या निवेदनात म्हटले आहे की, रेळेकर हे रिक्षा चालकांना विविध कारणास्तव त्रास देत असतात. त्यांना विचारणा करणार्या रिक्षाचालकांना त्यांची रिक्षा आरटीओ मध्ये जमा करण्याची दटावणी करतात. एखाद्या प्रवाशाने मध्यस्थी केल्यास त्यालाही सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू, असा दम देतात.
बसस्थानकाच्या बाहेरील रिक्षा थांब्याजवळ कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष विष्णू जांभळे, चंद्रशेखर शेटे, राजेंद्र चव्हाण, सचिन चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनावर 32 रिक्षा चालकांच्या स्वाक्षर्या आहेत.