सातारा : घरकुल योजनेत अनेक लाभार्थ्यांना अनुदानाअभावी कामाची गती मंदावली होती; परंतु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत राज्यात घरकुलांसाठी केंद्र व राज्य सरकारचा पाच हजार २९०.९३ कोटींचा निधी राज्य ग्रामीण गृहनिर्माण कक्षाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे घरकुलांची कामे जलदगतीने होणार आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्याला ४५ हजार ४८७ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, यामधील लाभार्थ्यांना निधी मिळणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सातारा जिल्ह्यास सर्वाधिक घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. लाभार्थ्यांना आधारद्वारे पहिला हप्ता वितरणाचे कामसुद्धा तालुकास्तरावरून करण्यात आले होते. लाभार्थ्यांना कामे सुरू केली; परंतु निधीअभावी कामाची गती मंदावली होती.
लाभार्थ्यांना साहित्य खरेदी, कुशल मजुरीवरील खर्चाचा प्रश्न निर्माण झालेला होता. आता शासनाने ग्राम विकास विभागांतर्गत राज्य ग्रामीण गृहनिर्माण कक्षाला निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत लाभार्थ्यांना बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान मिळणार आहे. परिणामी, घरकुलांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
सातारा जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तर सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्याला मिळाले आहे. राज्य ग्रामीण गृहनिर्माण कक्षाला केंद्र व राज्याकडून घरकुलांचा निधी उपलब्ध झाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत.