साताऱ्यात उद्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाचा जाहीर सत्कार

सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सातारकर साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे

by Team Satara Today | published on : 20 September 2025


सातारा  :  साताऱ्यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान मसाप, पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या  ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द लेखक व कांदबरीकार विश्वास पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडीबद्दल सातारकरांच्यावतीने श्री.पाटील यांचा जाहीर सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शाहू कलामंदिर येथे करण्यात येणार असल्याची माहिती ९९ व्या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

साता-यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या साहित्य संमेलनाची तयारी मसाप, पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फौंडेशनतर्फे जोरदार सुरु आहे. हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी आयोजक संस्था प्रयत्नशील आहेत. ९९ व्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी प्रसिध्द लेखक, कांदबरीकार विश्वास पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. निवडीनंतर प्रथम त्यांचा सातारकरांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती तर ९९ व्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पर्यटनमंत्री, जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानदादा वैराट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

साताऱ्यात होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सातारकर साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि स्वागत समिती सदस्य, कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याचे साहित्य संमेलन भविष्यकालीन संमेलनासाठी निश्चित पथदर्शी ठरेल
पुढील बातमी
ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार

संबंधित बातम्या