सातारा : ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसरातील वृक्ष संपदा रविवारी अज्ञाताने लावलेल्या वनव्यामध्ये होरपळली. मंगळाई देवी मंदिर परिसरातील आणि डोंगर उतारावरील शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वनविभागाने जाळ रेषा निर्धारित वेळीच करण्याची गरज असून नागरिकांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर जमीन परिसरातील तण जाळून टाकण्यासाठी वनवे लावणे गरजेचे असते, हा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र त्याकरिता नियंत्रित पद्धतीचा जाळ करून जमिनीला तणापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. मात्र हे जाळ मर्यादित न राहिल्याने त्यामुळे वृक्षसंपदा होरपळत आहे. असेच काहीसे चित्र रविवारी अजिंक्यतारा किल्ला परिसराच्या डोंगर उतारावर दिसत होते.
येथे पिंपळ, चंदन, लिंब अशी विपुल वृक्षसंपदा आहे. अजिंक्यतारा किल्ले परिसराच्या पायथ्याला असलेल्या मंगळाई देवी परिसरात पासून हाकेच्या अंतरावर असणार्या वृक्षसंपदेला वनव्याची झळ बसली. त्यामुळे काही हेक्टर परिसरातील शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सातारा शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अजिंक्यतारा किल्ल्यावर लागलेला वनवा आणि त्यामुळे उठणारे धुराचे लोट याचे चित्र दिसत होते.
यासाठी वनविभागाने नियंत्रित जाळ रेषा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र हा विषय वनविभाग कधीही गांभीर्याने घेत नाही. परिणामी त्याचा फटका येथील पर्यावरणाला बसत आहे. मंगळाई देवी परिसरापासून काही अंतरावर निवासी क्षेत्र आहे. वणव्याची आग डोंगर उताराच्या खालच्या भागापर्यंत पसरली तर जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. सातारा नगरपालिकेने त्यांच्या येथील कार्यक्षेत्रातील भाग म्हणून या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून वनवे लावणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.