मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त देशभरातील प्रमुख नेते सध्या महाराष्ट्रात आहेत. दररोज ठिकठिकाणी प्रचारसभांचे आयोजन केले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईत आहेत. अशातच मुंबईतील एका हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीवेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने बनावट मीडिया आयडीचा वापर करुन शहांच्या सुरक्षेला तडा दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका बैठकीसाठी आले होते. यावेळी आरोपी शक्ती प्रकाश भार्गव बनावट मीडिया आयडीचा वापर करुन हॉटेलमध्ये प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर 'रेड टॅमारिंड मिल स्कॅम'वर आवाज उठवला. तसेच गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या दिशेने कागद फेकले.
या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणून शक्ती प्रकाश भार्गवला हॉटेलमधून बाहेर काढले आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आता भार्गवला अटक करण्यात आली असून याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
समोर आलेल्या माहितीनुसार, भार्गव हे कानपूरमधील रेड टॅमारिंड मिल घोटाळ्याशी संबंधित तक्रारींना प्रतिसाद न मिळाल्याने निराश होते. त्यांनी या समस्येचा पाठपुरावा केला होता, परंतु काहीही कारवाई न झाल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अमित शाह यांचे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.