श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

विजय मांडके व गौतम भोसले यांचे उमेदवारी अर्ज मागे; वाचनालयाच्या हितासाठी माघार: विजय मांडके

by Team Satara Today | published on : 17 September 2025


सातारा,, दि. १७ : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली. नगर वाचनालयाला १७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यांचे औचित्य साधत सर्वांनी समन्वयाने ही निवडणूक बिनविरोध झाली. 

वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाच्या चार आणि कार्यकारी मंडळाच्या आठ अशा बारा जागांसाठी ही निवडणूक होती. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विश्वस्त मंडळासाठी चारच अर्ज दाखल झाल्यामुळे या चारही जागा बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले. कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नगर वाचनालयाच्या १७५ व्या वर्षाचे औचित्य साधून तसेच सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही निवडणूक बिनविरोध होणे महत्त्वाचे होते. 

यासंदर्भात सत्तारुढ संचालक मंडळाच्या प्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या श्री. विजय मांडके व श्री. गौतम भोसले यांच्याशी संपर्क साधला. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी असणारे महत्त्व लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार श्री. मांडके व श्री. भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. कार्यकारी  मंडळाच्या आठ जागांसाठी आठच अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध झाल्याची औपचारिक घोषणा नंतर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. नितीन शिंगटे यांनी काम पाहिले.

नगर वाचनालयाचे बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे आहेत. 

विश्वस्त समिती - विजयराव पंडीत, अजितराव कुबेर, अनंतराव जोशी, अतुल शालगर

कार्यकारी मंडळ - वैदेही कुलकर्णी, प्रकाशराव शिंदे, डॉ. राजेंद्र माने, प्रसाद गरगटे, रवींद्र झुटिंग, प्रदीप कांबळे, जयंत देशपांडे, नारायण जाधव.

वाचनालयाच्या हितासाठी माघार: विजय मांडके 

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विजय मांडके व गौतम भोसले यांनी घेतलेली भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. श्री. मांडके यांनी सामंजस्याने व नगर वाचनालयाच्या हिताच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे नमूद केले. वाचनालयाचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन मांडके यांनी त्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात उबाठाकडून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन
पुढील बातमी
तरुणांनी संविधानाच्या रक्षणासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे

संबंधित बातम्या