सातारा : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गात भरती प्रक्रिया सुरू असून मंगळवारी समुपदेशाने 83 पात्र उमेदवारांची कंत्राटी ग्रामसेवकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बुध्दे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव, अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, ग्रामपंचायत अधिकारी संकेत शेडगे, नंदकुमार भोसले, संजय जाधव, विजय ढाणे, अविनाश कवळे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागांतर्गत सरळ सेवा भरतीने एकूण 83 ग्रामसेवकांना नियुक्ती आदेश देण्यात आला. समानीकरण पध्दतीने तालुकानिहाय रिक्त पदे भरण्यात आलेली आहेत. यानुसार सातारा तालुक्यात 11, कोरेगाव 14, खटाव तालुका 5, माण 7, फलटण आणि खंडाळा तालुका प्रत्येकी 3, वाई 6, महाबळेश्वर 2, जावळी 7, कर्हाड 10 आणि पाटण तालुक्यात 15 जणांना नियुक्ती मिळाली असल्याचे सांगण्यात आले.