सातारा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंजमध्ये पकडण्यात आलेल्या आणखी एका वाघिणीचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर करण्यात आले आहे. ताबोडातील 'छोटी तारा' या प्रसिद्ध वाघिणीची ती मुलगी असून तिचे वय साधारण दोन वर्षांचे आहे. 'ऑपरेशन तारा' अंतर्गत ९०० कि. मी. चा प्रवास करून आणलेल्या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आलं आहे.
ताडोबा-अंधारी तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी, अशा एकूण आठ वाघांच्या स्थानांतरणास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाघांच्या स्थानांतरणास सुरूवात झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरात ८ डिसेंबर रोजी सायंकाळी या वाघिणीला सुरक्षितपणे पकडण्यात आलं होतं. वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला चांदोली राष्ट्रीय उद्यानात आणून सोनारली अनुकूलन कुंपणात सोडण्यात आलं.
सॉफ्ट रिलिज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश, फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील हे वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत.
राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून, या मोहिमेवर व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे लक्ष आहे. वाघिणीच्या सॉफ्ट रिलिजची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. ताडोबा-अंधारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) यांच्या संयुक्त पथकांद्वारे ही मोहीम राबविण्यात येत असून, त्याचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
ताडोबातून स्थानांतरीत केलेल्या T7-S2' या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 'तारा' या नावाने ओळखले जाईल. ताराची वंशावळ फार समृद्ध आहे. कारण, ती ताडोबात सात वेळा पिल्लांना जन्मास घालणाऱ्या छोट्या ताराची मुलगी आहे. याठिकाणी तिचा सांकेतिक क्रमांक 'STR -T5' असा असेल. सध्या 'STR-T1' (सेनापती) आणि 'STR-T2' (सुभेदार) हे दोन्ही नर 'STR-T4' (चंदा) पासून प्रत्येकी ९ आणि २५ किलोमीटरच्या परिसरात आहेत.