कराड : नागरीवस्तीत शिरून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना काले- कालवडे रस्त्यावर कालवडे नावाच्या माळ शिवारात घडली. पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या घटनेत सुभाष यादव यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला. संबंधित घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काले व परिसरातील शिवारात बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांना अनेकदा त्याचे दर्शनही झाले होते. त्या परिसरात सुळाचा डोंगर, आगाशिव गड व लहान मोठ्या टेकड्या आहेत. त्यामुळे परिसरात बिबट्या त्याच्या पिल्लांसह वास्तव्यास आहेत. बिबट्यांना अन्नाच्या शोधार्थ अनेकदा जनावरांच्या गोठ्यातील लहान गुरे, वासरांसह कुत्र्यावर हल्ला करत आहे.
कालेतील शेतकरी सुभाष यादव व त्यांचे बंधू रणजित यादव यांचाही या परिसरात १०० वर जनावरांचा मुक्त गोठा आहे. त्या परिसरातच ते वस्तीस आहेत. तेथे बिबट्याचा वावर आहे. पहाटे सव्वा चारच्या सुमारास गायींच्या हंबरण्याचा व कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज झाला. त्या वेळी यादव जागे झाले.
सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे नेमका आवाज कशाचा आहे, ते त्यांनी सीसीटीव्हीत पाहिले. त्यांना गोठ्यात बिबट्या दिसला. बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला उचलून नेले. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा केला.
काले परिसरातील घटनेची आज दिवसभर परिसरात चर्चा होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ऊसतोडणी सुरू आहे, तर अनेक ठिकाणी ऊस जागीच आहे. त्याचा बिबट्या, त्याची बचडे आसरा घेत आहेत. त्यामुळे परिसरात शेतातील जायलाही लोक घाबरत आहेत. परिसरात वावरणाऱ्या बिबट्या व त्याच्या बछड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरात शेतकरी करत आहेत.