ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारे सहा जणांना फलटण व वाई येथून अटक; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 23 February 2026


सातारा :  ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांच्या चोर्‍या करणारया सहा जणांना वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने फलटण व वाई येथून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना धोम कॅनॉलच्या कडेला असलेल्या रोहित्रांमध्ये घडत होत्या. त्या परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. तरीही वाई पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान तीन आरोपी फलटण येथील तर त्यांना मदत करणारे तीन आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले. सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या 300 किलो तांब्याच्या तारा, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच पाच मोबाईल असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुकेश माणिक जाधव (वय 45, रा. मलठण, फलटण), अनिकेत सुभाष बनसोडे (वय 22, रा. मलठण, फलटण), अर्जुन राजू जाधव (वय 20, रा. मलठण, फलटण), रोहन लाखन घाडगे व विजय बाबुराव शिंदे (वय 36), मनोज नामदेव घाडगे (वय 40, तिघेही रा. यशवंतनगर, वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर व पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भरदिवसा दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास; दागिन्यांसह 25 लाखांचा ऐवज चोरीस

संबंधित बातम्या