जिल्ह्यात परतीचा पाऊस

by Team Satara Today | published on : 06 August 2025


सातारा : आता कुठे खानदानी पावसाचा कालावधी सुरू झाला असताना अचानकच परतीच्या पावसाचे नगारे गरजू लागले. मंगळवारी सकाळी कडक उन्हाचा तडाखा बसत होता; मात्र दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ऐन पावसाळ्यात परतीच्या पावसारखा पाऊस बरसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

ऑगस्ट महिना हा मान्सूनचा एक महत्त्वाचा भाग आहे. या महिन्यात जोरदार पाऊस पडत असतो. अनेकदा पावसाळ्यात मान्सूनच्या सर्वाधिक पावसाचीही नोंद होत असते. परतीचा पाऊस साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. जेव्हा मान्सूनचा जोर कमी होतो आणि हवामान बदलू लागते. जेव्हा नैऋत्य मोसमी वारे माघार घेवू लागतात तेव्हा परतीचा पाऊस येतो. मात्र, यंदा निसर्गाचं चक्र पालटून गेले आहे. 10 मेपासूनच पावसाळ्याला सुरूवात झाली तर ऑगस्ट महिन्यातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याचे प्रथमच घडत आहे.

मंगळवारी सातार्‍यात काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणार्‍या वार्‍यांसह विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळनंतर परतीच्या पावसाचे नगारे शहरासह जिल्ह्यात वाजू लागले. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात पावसाने पुर्णत: उघडीप दिली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा हा पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कासवंडच्या स्ट्रॉबेरी वाईनला ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमात आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता
पुढील बातमी
महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य

संबंधित बातम्या