सातारा : सातारा शहरातील शाहुपुरी परिसरात शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत टोळीतील चार जणांना सातारा पोलीसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा प्रमुख प्रेम गणेश पवार (वय २१, रा. शुक्रवार पेठ, सातारा) याच्यासह आनंदा ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय २०), प्रेम आबासाहेब अडागळे (वय २१) व अनिकेत सोमनाथ अहिवळे (वय २०, सर्व रा. सातारा) यांचा समावेश आहे.
सदर टोळीविरुद्ध दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, नागरिकांकडील मालमत्ता हिसकावून घेणे, मारहाण करणे, दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे यांसारखे अनेक दखलपात्र गुन्हे शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वी वारंवार अटक व प्रतिबंधक कारवाई करूनही या टोळीने आपली गुन्हेगारी कारवाई सुरूच ठेवली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शाहुपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. एस. जी. म्हेत्रे यांनी या टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक व हद्दपार प्राधिकरण मा. तुषार दोशी यांच्या आदेशाने चारही आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी निवडणूक काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांच्या पथकासह शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.