सातारा : शाहूनगर येथील किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नोटरी व विधिज्ञ अॅड. सचिन शेखर तिरोडकर यांनी सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक व इतिहासप्रेमी किल्ले अजिंक्यताऱ्यावर भेट देण्यासाठी येतात. मात्र शाहुनगर येथील गणेश कॉलनी शेजारील मैदानापासून किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मागील अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिग साचले असून, तो उचलण्यात आलेला नाही.
या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर कचरा विखुरला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग असून, अशा परिस्थितीमुळे सातारा शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शाहुनगर परिसरासह किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी अॅड. सचिन तिरोडकर यांनी केली आहे.