परळीच्या प्रणव कुलकर्णी चा यूपीएससी परीक्षेत झेंडा

256 रँक मिळवून मिळवले धवल यश

by Team Satara Today | published on : 22 April 2025


सातारा : परळी, तालुका सातारा येथील प्रणव विनय कुलकर्णी या सातारच्या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोग 2025 रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये भारतातून 256 वा क्रमांक मिळवत धवल यश मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रणवला निकाल समजताच त्याने थेट दिल्लीवरून आपल्या वडिलांना या सुखद यशाची वार्ता कळवली.

मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. यामध्ये साडेसात लाख विद्यार्थ्यांमधून 1009 मुलांनी उज्वल यश प्राप्त केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा शहरालगतच्या परळी या गावातील प्रणव विनय कुलकर्णी या विद्यार्थ्याने 256 वा क्रमांक मिळवला. यामुळे सातार्‍याच्या धवल शैक्षणिक परंपरेचा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रणवने मागील वर्षी सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र मुलाखत आवेदन प्रक्रियेतून थोडक्यात यशाने त्याला हुलकावणी दिली होती. यापूर्वी त्याने सीडीएस परीक्षेसाठी दोन वेळा प्रयत्न करून त्यातही यश मिळवले होते.

विनयचे प्राथमिक शिक्षण मंगळवार पेठेतील सातारा इंग्लिश मीडियम स्कूल मधून, तर सातवी ते बारावी शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा येथून झाले आहे. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून पदवी मिळवली आणि त्याची तयारी सुरू असताना समांतरपणे त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुद्धा सराव ठेवला होता. पुस्तकांचे मुळातून वाचन आणि जास्तीत जास्त सराव हे त्याच्या अभ्यासाचे प्रमुख सूत्र होते. त्याने आपल्या यशाचे हे रहस्य थेट दिल्लीवरून पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रणव चे वडील विनय कुलकर्णी हे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका येथील शाखेमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत, तर आई गृहिणी आहे. प्रणव हा कुलकर्णी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा आहे. प्रणवने दुपारी अडीच वाजता आपल्या या धवल यशाची बातमी वडिलांना दिल्यानंतर त्यांना आभाळ ठेंगणे झाले. सातार्‍यात प्रणवच्या या यशाची वार्ता पसरताच सर्व स्तरातून त्याचे या उज्वल यशाबद्दल अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज देशामध्ये आदर्शवत !
पुढील बातमी
जन सुरक्षा विधेयक संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

संबंधित बातम्या