कराड : येथील वाखाण ते कोरेगाव रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणांतर्गत जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे जागा मोजणीचे काम स्थानिकांनी बंद पाडले. रस्ता रुंदीकरण समिती व शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. स्थानिकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे जागा मोजणीला आलेल्या पालिका व भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. परिणामी, त्यांना स्थानिकांनी हद्द मोजणी करून दिली नाही.
येथील वाखाणातून कार्वे- कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर केले आहे. त्या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात स्थानिकांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचेही काम बंद झाले होते. त्यानंतर पुन्हा काल त्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत जागा मोजणीच्या नोटिसा बजावल्या. त्यात रस्ता रुंदीकरणासाठी प्रचलीत हद्दी निश्चित केल्या जाणार आहेत, असे नमूद केले होते. पालिका व भूमिअभिलेखचे कर्मचारी दुपारी जमीन मोजणीला येणार होते. मात्र, काल नोटीस आल्या अन् अचानक जागा मोजणीला येणार असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला.
दुपारी प्रत्यक्षात मोजणीला आलेल्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने मोजणी झाली नाही. शेतकरी संघटनेचे विनायक जाधव, माजी नगरसेवक सौरभ पाटील, अरुण पाटील, विनायक कदम, युवराज कदम, शिवाजी कदम, राजेंद्र कदम, चंद्रहास पुजारी यांच्यासह शेतकरी, रहिवाशांनी प्रत्यक्ष मोजणी करतानाच हरकती घेतल्या. त्यामुळे मोजणीच होऊ शकली नाही. त्यांचे ते काम बंद पाडले.
वाखाणातील रस्ता रुंदीकरणासह प्रचलित रस्ता कसा होणार, त्याचे स्पष्टीकरण दिल्याशिवाय काम होऊ देणार नाही. प्रशासनाकडून पुढील महिन्यात मोजणी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोजणीची तारीख निश्चित करून किमान तीन दिवस आधीच सर्वांना त्या नोटिसा द्याव्यात. त्या नोटीसमध्ये स्पष्टीकरण असावे.
- विनायक जाधव, कराड तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना