तासवडे एमआयडीसी येथे 6 कोटीचे कोकेन जप्त

तळबीड पोलिसांची धडक कारवाई

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : तासवडे, ता. कराड येथील एम आय डी सीतील शेतीची खते बनवण्याचा बहाणा करणार्‍या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे. शुक्रवार दि. 23 रोजी ही घटना उघडकीस आली असून याबाबत कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलीसांनी 1270 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तासवडे एम आयडीसीतील बी- 56 ब्लॉकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने कोकेन बाळगल्याचे पोलीसांनी सांगितले. या कारवाईने तासवडे एम आयडीसीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील 21 मे रोजी सायंकाळी 4.25 च्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव ता. जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत 6 कोटी 35 लाख रुपये किंमतीचे 1270 ग्रॅम कोकेन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कंपनीत मिळून आले. 

याप्रकरणी कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ ता. पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवार्डे ता. पाटण, विश्वनाथ शिपणकर रा. दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, तळबीड पोलीस प्लॉट नंबर बी. 56 येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहीती मिळाली. संशय बळावल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनि किरण भोसले यांनी पथकासह बी 56 मधील सूर्यप्रभा कंपनीत काहीतरी संशयास्पद केमिकल असल्याची पाहणी केली. तेथील संशयित पदार्थ ताब्यात घेतला. सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात असे सांगितले जाते होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगण्यात आले. कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केली असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आल्याने पोलीसांनी तो ताब्यात घेवून त्याची तपासणी केला असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन 1370 ग्रॅम असून हे कोकेन सहा कोटी 35 लाखाचे असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले, अमित बाबर, फौजदार साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, काळे, पोलीस शशिकांत खराडे, शहाजी पाटील, योगेश भोसले, आनंदा रजपूत, गोरखनाथ साळुंखे, निलेश विभुते, अभय मोरे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ
पुढील बातमी
पिरवाडी व कोडोलीत घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या