सातारा : साताऱ्यात दि. २२ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत दुर्गादेवी उत्सव व दसरा साजरा होणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांनी सण उत्साहात, पण सुरक्षिततेत साजरा करावा यासाठी सातारा पोलिसांनी कडक पावले उचलत ५१ उपद्रवींवर मनाई आदेश केले आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी प्रवृत्तीचे व उपद्रवी इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
शाहुपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक सराईत गुन्हेगारांनी यापूर्वी खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव करून मारामारी करणे, गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगणे, संगनमत करून शिवीगाळ, धमक्या देणे, दुखापत करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. जामिनावर सुटूनही हे इसम पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सक्रिय झालेले दिसत असल्याने अशा ५१ उपद्रवी इसमांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली.
शाहुपुरी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही केली. या प्रस्तावाला मान्यता देऊन मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडुकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियमच्या कलम अन्वये आदेश पारित केले आहेत. त्यानुसार, १ ते २ ऑक्टोबर पर्यंत या ५१ उपद्रवी इसमांना सातारा तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास, वावरण्यास किंवा थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.