वाई, दि. 16 : दि प्रसाद दि प्रसाद को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई या संस्थेच्या पाचवड शाखेतील ठेवी ठेवीदार नागरिकांना परत मिळवून द्याव्यात तसेच सोसायटीच्या कारभाराची चौकशी करुन चेअरमन, व्यवस्थापकासह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाई तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेने केली आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मयूर नळ, सार्थक कोंढाळकर, वैभव जाधव, हर्षद हरचुंदे, दीपक भडंगे,रूपेश चोरगे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
याबाबत वाईच्या सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा पाचवड ही सोसायटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार नोंदवलेली आहे. या सोसायटीच्या विविध शाखा असून वाई तालुक्यातील पाचवडमध्ये शाखा कार्यरत आहे व ती सध्या बंद स्वरूपात आहे.
सोसायटीच्या पाचवड शाखेमध्ये काही सभासद व बिगर सभासदांच्या ठेवी आहेत. त्यापैकी काही लोकांच्या ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत. या शाखेमधील जवळपास ठेवी या 15 कोटी रक्कमेपक्षा ही जास्तीच्या आहेत. मुदतीनंतर ठेवीदार सदर शाखेमध्ये ठेव पावतीची रक्कम काढण्यासाठी गेले असता, ठेवींच्या रक्कमा आज देतो, उद्या देतो असे म्हणून वारंवार टाळाटाळ केली जात आहे व ठेवीदारांच्या वर दादागिरीची भाषा केली जात आहे.
सदर सोसायटीचा आर्थिक व्यवहार हे सहकार कायद्याला अनुसरून होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सोसायटीचे चेअरमन दीपक रामचंद्र सोनावणे व व्यवस्थापक रुपेश पवार व संचालक मंडळ यांची चौकशी करण्यात यावी व ठेवीदारांच्या ठेवी मिळवून द्याव्यात असे न झाल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वेळ पडल्यास ठेवीदारांच्या न्याय व हक्कासाठी मनसे येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल, असा इशारा देण्यात आला आहे.