संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ सातार्‍यात युवकांचा मोर्चा

पोवई नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : हिंदुस्तान प्रतिष्ठान या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. संपूर्ण राज्यात त्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. भिडे गुरुजींना समर्थन देण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये भिडे समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी येथील पोवई नाक्यावर भिडे गुरुजींना पाठिंबा व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले. कॉंग्रेस सह इतर संघटनांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत रास्ता रोको सारखी आंदोलने केली होती. मात्र सातार्‍यात सोमवारी भिडे गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी समर्थक रस्त्यावर उतरले.
येथील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भिडे समर्थकांनी गांधी टोपी घालून सर्वप्रथम प्रार्थना केली. गुरुजी के सन्मान मे हर हिंदू मैदान मे, अशा आशयाचे फलक घेऊन समर्थकांनी भिडे गुरुजींना पाठिंबा व्यक्त केला. भिडे गुरुजींच्या प्रतिमेपुढे प्रार्थना म्हणण्यात येऊन समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह जय्यत पोलीस बंदोबस्त यावेळी पोवई नाक्यावर हजर होता. सुमारे 500 हून अधिक समर्थकांनी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा काढला. मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भिडे गुरुजींना पाठिंबा व्यक्त केला. यानंतर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाखरी येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थी व पालक उतरले सातार्‍यातील रस्त्यावर
पुढील बातमी
शिरवळची पाणीपुरवठा योजना आमदार समर्थकांनी पळवली

संबंधित बातम्या