जिमी डोनाल्डसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युट्यूबर मिस्टर बीस्टने याच्या नवीन फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मिस्टर बीस्टने तीन बॉलीवूड सुपरस्टार खान – शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. हा फोटो सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या एका कार्यक्रमातील आहे. मिस्टर बीस्टने १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिस्टर बीस्ट तिन्ही खानसोबत आनंदाचा क्षण शेअर करताना दिसला आहे. चला जाणून घेऊ कोणत्या खास कारणासाठी हे तिन्ही खान एकत्र आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शाहरुख खान पूर्णपणे काळ्या रंगाचा सूट आणि बूट घातलेला दिसतो आहे. ‘मिस्टर बीस्ट’ देखील खूप सुंदर दिसतो आहे. सलमान खानने फोटोमध्ये निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, तर आमिर खानने इंडो-वेस्ट आउटफिट घातला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिस्टर बीस्टने लिहिले आहे की, ‘नमस्कार भारतीयांनो, आम्ही सर्वांनी एकत्र काहीतरी करायला हवे का?’ असा प्रश्न त्याने चाहत्यांना केला आहे.
खरं तर, काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियातील रियाध येथे आंतरराष्ट्रीय मंचावर जॉय फोरम आयोजित करण्यात आला होता, जिथे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. बॉलीवूडमधून आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा फोटो देखील तिथला असल्याचे सांगितले जात आहे.
फोटो व्हायरल होताच ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “अंबानीनंतर आता मिस्टर बीस्टने हे केले आहे – तिन्ही खानना एकाच फ्रेममध्ये आणणे सोपे काम नाही.” दुसऱ्याने विनोद केला, “मिस्टर बीस्टचा पुढचा पप्रोजेक्ट कदाचित बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर असेल.” असे म्हणून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
या वर्षीचा जॉय फोरम कार्यक्रम सौदी अरेबियातील रियाध येथे जनरल एंटरटेनमेंट अथॉरिटी (GEA) चे अध्यक्ष महामहिम तुर्की अल-शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे. या कार्यक्रमात हॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रमुख नावे देखील सहभागी झाली होती, ज्यात डाना व्हाइट, शकील ओ’नील, टेरी क्रूज, ली जंग-जे आणि गॅरी वायनरचुक सारख्या जागतिक व्यक्तींचा समावेश होता.