सातारा : बाजार समिती, नगरपालिका व प्रशासन यांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठीत लाथ मारल्याचा आरोप करत आज साताऱ्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या नावाखाली सातारा बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेत भरवली जाणारी भाजी मंडई अचानक कोणताही पर्याय न देता बंद करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातून रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कडाक्याच्या थंडीत भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर बसून विक्री करण्याची वेळ आली आहे.
अनेक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज सातारा बाजार समितीच्या परिसरात भाजीपाला विक्री करतात. मात्र अचानक नोटीस बजावत भाजी मंडई बंद केल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर बसण्यास भाग पाडले गेले. “जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे,” अशी तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकाराचा जाहीर निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे. “आजच्याच आज शेतकऱ्यांना सन्मानजनक व कायमस्वरूपी पर्यायी जागा देण्यात यावी. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट साहित्य संमेलनाच्या मंडपात भाजी विक्री करण्यात येईल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. सातारा बाजार समिती, नगरपालिका व जिल्हा प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.