गुलाबांच्या पाकळ्यांचा गुलकंद घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. गुलकंदाच्या बरणीत चमचाभर गुलकंद जरी खाल्ला तरी तो अजून खाण्याचा मोह आवरताच येत नाही. गुलकंद म्हणजे सुगंधी गुलाबांच्या पाकळ्यांचा तयार केलेला गोड, थंडावा देणारा आणि आरोग्यदायी पदार्थ. आयुर्वेदात गुलकंदाला विशेष असे महत्व आहे. गुलकंद शरीराला थंडावा देत असल्याने आपण शक्यतो उन्हाळ्यात हमखास गुलकंद खातोच. परंतु, गुलकंद हा फक्त चवीलाच उत्तम नसून महिलांच्या आरोग्यासाठीही खूपच लाभदायक असतो.
आयुर्वेदानुसार, गुलकंद शरीराला नैसर्गिक थंडावा देतं, शरीरातील उष्णता संतुलित करतं आणि मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास मदत करतं. शिवाय, त्वचेची चमक टिकवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी गुलकंद हा सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरतो. महिलांनी रोजच्या आहारात गुलकंदाचा समावेश केला, तर सौंदर्य आणि आरोग्य या दोन्हींचा उत्तम समतोल राखता येतो. महिलांनी गुलकंद खाण्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात.
महिलांनी गुलकंद खाण्याचे फायदे...
१. रक्तवाढीसाठी :- गुलकंद अत्यंत आरोग्यदायी असून अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असे असते. गुलकंदात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबीनचं उत्पादन वाढवण्यास आणि शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करतं. नियमितपणे गुलकंद खाल्ल्यास शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता राहत नाही आणि आरोग्य चांगलं टिकून राहतं.
२. मासिक पाळीसाठी उपयुक्त :- गुलकंद खाल्ल्याने महिलांमध्ये पाळी नियमित येण्यास आणि त्यासंबंधित इतर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय, गुलकंद हार्मोन्सचं संतुलन राखून मासिक पाळी नियमित करण्यात उपयुक्त ठरतं. तसेच, प्रजननाशी संबंधित अवयवांना आराम देतं आणि मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना व पोटात क्रॅम्प्स येण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतं.
३. मूड स्विंग्स कमी करण्यास मदत होते :- महिलांनी गुलकंद नियमित खाल्ल्यास मूड स्विंग्स कमी होण्यास मदत होते. गुलकंदात काही विशेष अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून मानसिक शांतता देतात आणि मन प्रसन्न ठेवतात. तसेच, हे शरीरातील कार्टिसोल लेव्हल कमी करतं, ज्यामुळे ताण-तणाव आणि ऍन्झायटी दूर होऊन कायम फ्रेश राहण्यास मदत करते.
४. गर्भधारणेत अॅनिमियापासून संरक्षण करण्यात मदत होते :- गर्भधारणेदरम्यान महिलांना अॅनिमियाची (रक्ताची कमतरता) समस्या उद्भवू शकते, ज्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरही होऊ शकतो. अशावेळी आयर्न आणि आवश्यक मिनरल्सने भरपूर गुलकंद शरीरातील रक्त वाढवण्यात आणि अॅनिमियापासून बचाव करण्यात मदत करतं. यामुळे प्रेग्नंसीदरम्यान रक्ताची कमतरता झाल्याने जाणवणाऱ्या कमजोरीसारख्या लक्षणांपासून संरक्षण मिळतं.
५. प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करतं :- गुलकंद प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. हे हार्मोन्सचं संतुलन राखून मूड सुधारतं, स्टॅमिना वाढवतं आणि प्रजनन क्षमतेला चालना देतं. याशिवाय, महिलांच्या प्रजनन अवयवांतील कोरडेपणा कमी करून त्यांना आराम देते.
६. त्वचेसाठी फायदेशीर :- गुलकंदामध्ये नैसर्गिक पिगमेंट्ससोबतच एसेंशियल ऑईल्स असतात, जे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. त्वचेचा डलनेस कमी करतं आणि त्वचेमधील रक्ताभिसरण वाढवण्यास उपयुक्त ठरतं. याशिवाय, गुलकंदातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पुरळ कमी करून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
७. ब्लोटिंग कमी करण्यासाठी :- महिलांमध्ये ब्लोटिंगची समस्या फारच कॉमन आहे. पाळीच्या काळात किंवा काहींना जेवणानंतर पोट फुगणे आणि गॅसची समस्या होते. अशावेळी गुलकंद खाल्ल्याने पचनसंस्थेतील एन्झाइम्स वाढवून पचन सुधारण्यास मदत करतं. याशिवाय, गुलकंदातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म पोटातील सूज कमी करून ब्लोटिंगपासून आराम मिळवण्यात उपयुक्त ठरते.