कर्नाटक : कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चामराजनगर जिल्ह्यातील नर महाडेश्वर हिल्स वन्यजीव अभयारण्यात ५ वाघ मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एक आई आणि तिच्या चार बछड्यांचा समावेश आहे. वनमंत्री ईश्वर खांडे यांनी या वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, सर्व प्रक्रिया आणि शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
भारतात मध्य प्रदेशानंतर कर्नाटकात सर्वाधिक वाघ आहेत. येथे वाघांची संख्या ५६३ आहे. वन्यजीवांशी वाढत्या संघर्षामुळे, विशेषतः वाघ गुरांवर हल्ला करुन त्यांना आपले शिकार बनवत असल्याने, गावकरी अनेकदा विष आणि सापळ्यांचा वापर करुन वाघांना संपवण्याचा प्रयत्न करतात. वन विभागाच्या पथकाने मृत वाघांचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत.
वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी वाघिणीने एका गायीची हत्या केली होती. असे मानले जाते की, त्या कारणामुळेच या वाघांना विष देऊन मारण्यात आले आहे. वनमंत्री ईश्वर खांद्रे म्हणाले की, 'एमएम हिल्समध्ये पाच वाघांचा मृत्यू झाला, ही खूप दुर्दैवी घटना आहे. मी वन विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे आणि या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.'