मुंबई : मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. भूमिगत असलेल्या या मेट्रो स्थानकात आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही. दरम्यान मुंबई मेट्रो-3 च्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरू असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात असलेल्या लाकडी साहित्य आणि फर्निचर ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.
मेट्रो स्टेशनला लागलेली ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती मिळत आहे. बीकेसी स्टेशनवरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून मेट्रोमधील प्रवासी सुखरुप आहे.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मेट्रोनं दिली. तसेच तात्पुरत्या स्वरुपात बांद्रा कॉलनी स्टेशनवरुन ग्राहकांना मेट्रो पकडण्याची मुभा देण्यात आली आहे.