सदोष वैद्यकीय सेवा पुरवल्‍याबद्दल १२ लाख रुपये दंडाची डॉ. स्‍मिता कासार यांना शिक्षा

by Team Satara Today | published on : 07 October 2025


सातारा : सदरबझार येथील डॉ. स्‍मिता कासार यांना सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायालयातील अध्यक्ष व सदस्‍य असलेल्‍या तीन न्‍यायाधिशांनी दंडाची शिक्षा सुनावली. प्रसूतीवेळी गर्भाचा हात दुखावल्‍याने व गर्भवती महिलेला मानसिक त्रास झाल्‍याने १२ लाख २५ रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्‍यान, १० वर्षे हा खटला न्‍यायालयात सुरु होता.

लिना मंगेश इंदलकर (रा.इंदवली पोस्‍ट करंदी ता.जावली) यांनी याबाबत ग्राहक न्‍यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी, लिना इंदलकर या गर्भवती असल्‍याने डॉ.स्‍मिता कासार यांच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी २५ ऑक्‍टोबर २०१५ साली गेल्‍या होत्‍या. प्रसूतीवेळी डॉक्‍टरांकडून हलगर्जीपणा झाल्‍याने बाळाचा एक हात दुखवला गेला. यानंतर मुलावर सातार्‍यातील दुसर्‍या रुग्णालयात व पुढे पुणे येथेही उपचार घेण्यात आले. मात्र बाळाचा हात ठीक झाला नाही.

अखेर तक्रारदार लिना इंदलकर यांनी १ नोव्‍हेबर २०१६ साली सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण या न्‍यायालयात डॉक्‍टरांविरुध्द नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. या दाव्‍यामध्ये १५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांच्यावतीने ॲड. एम. बी. पाटील यांनी युक्‍तिवाद केला. दोन्‍ही पक्षाचा युक्‍तिवाद ऐकून सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायालयाचे अध्यक्ष न्‍या.प्रमोद गिरी गोस्‍वामी, सदस्‍य न्‍या. रोहिणी जाधव, सदस्य न्‍या. मनिषा रेपे यांनी निकाल दिला. सदोष वैद्यकीय सेवा पुरवल्‍याबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून १० लाख रुपये व गर्भवती महिलेला मानसिक त्रास झाल्‍याने सव्‍वादोन लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'अजिंक्यतारा'कडून सभासद- शेतकऱ्यांची दिवाळी गोड; प्रति टन १०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
पुढील बातमी
कराड उपविभागीय अधिकारी, अव्वल कारकून यांच्या खातेनिहाय चौकशी करा : गणेश पवार

संबंधित बातम्या