स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : महाराष्ट्रात साहित्यसंस्थांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट आहे. भाषेसाठी साहित्यसंस्था, लेखक आणि शासन यांनी असे एकत्रित प्रयत्न करत आहेत, हे चित्र दिलासादायक आहे. भाषेसाठी हे अनुकूल वातावरण आहे. भूमी सुपिक असल्याचे हे लक्षण आहे, अशा अनुकूल वातावरणात भाषेचा विकास होत राहो, अशा शुभेच्छा ज्ञानपीठ सन्मानप्राप्त साहित्यिक प्रा. रघुवीर चौधरी यांनी दिल्या.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील समारोप समारंभात प्रा. रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी साहित्य संमेलनाच्या दीर्घ परंपरेचाही प्रा. रघुवीर यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. ही परंपरा वर्धिष्णु होत राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
गुजराती भाषेत पाळणा..
महाराष्ट्रातील नेते दीर्घ भाषणेही उत्तम करतात, अशी टिप्पणीही रघुवीर यांनी याप्रसंगी केली. ते म्हणाले, सातारा जिल्हा शिवाजी महाराजांशी संबंधित आहेच, पण गुजरातमधील सौराष्ट्राचाही शिवाजी महाराजांशी संबंध आहे. सौराष्ट्रातील एक कवी जव्हेरचंद मेघाणी यांनी बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेत पाळणा रचला आहे. बालशिवाजीला झोप यावी, म्हणून अंगाईगीत गाणाऱ्या जिजा मातोश्रींच्या मुखी हा पाळणा आहे. १५०० मैलांचे भौगोलिक अंतर असूनही, या अंगाईगीताने महाराष्ट्रापासून सौराष्ट्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गुजराती भाषेत बरेच लेखन झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महानायक कादंबरीचे कौतुक..
मी यापूर्वी आंतरभारतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आलो होतो. सानेगुरुजी आणि विनोबाजी यांनी तुरुंगवासात गीताप्रवचनांची निर्मिती केली. मीही तेव्हा त्यातून प्रेरणा घेत एक दीर्घकविता लिहिली होती, अशी आठवण रघुवीर यांनी सांगितली. सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे रघुवीर चौधरी यांनी विशेष कौतुक केले. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे विलक्षण कार्य केले, त्यांचे तपशील पाटील यांनी संशोधन – अभ्यासातून वाचकांसमोर ठेवले आहेत. मी या कादंबरीचा गुजराती अनुवाद वाचला आहे आणि प्रभावित झालो. विश्वास पाटील यांची भेट घेणे, हाही महाराष्ट्रात येण्याचा एक हेतू होता, असे त्यांनी सांगितले.