४८ तासांत रेल्वेतून होणाऱ्या 'सोनेरी वाहतुकीच्या' दोन घटना उजेडात

रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या

by Team Satara Today | published on : 14 October 2025


नागपूर :  रेल्वेतील विविध मार्गावर रोज कोट्यवधींच्या सोन्याची बेमालूमपणे तस्करी केली जात आहे. गेल्या ४८ तासांत रेल्वेतून होणाऱ्या 'सोनेरी वाहतुकीच्या' दोन घटना उजेडात आल्याने देशभरातील रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

'लोकमत'ने यापूर्वीही अनेकदा रेल्वेतून 'गोल्ड स्मगलिंग' होत असल्याचे वृत्त प्रकाशित करून तपास यंत्रणांचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. विमानाने सोन्याची वाहतूक किंवा तस्करी केल्यास हमखास पकडले जाण्याचा धोका असतो. कारण स्कॅनर तपासणीत संबंधित प्रवाशी 'सोनेरी सफर' करत असल्याचे लगेच लक्षात येते. त्यामुळे सोन्याच्या वाहतूक किंवा तस्करीचा धोका पत्करत नाहीत. खासगी वाहनाने सोन्याची वाहतूक किंवा तस्करी केली तर तपास यंत्रणांकडून पकडले जाण्याचा किंवा लुटमारीचा धोका असतो. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रासह विविध प्रांतात बांगलादेशी सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती.

लोकमतच्या वृत्तामुळे डीआरडीआयच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांनी त्यावर विशेष लक्ष ठेवले. त्यानंतर कोलकात्याहून कोट्यवधींचे सोने घेऊन नागपूर, यूपी, मुंबईतील काही तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून कोट्यवधींचे सोनेही जप्त केले. या तस्करीत नागपुरातील एका आरोपीचा मोठा रोल असल्याची तेव्हापासून जोरदार चर्चा आहे. या कारवाईनंतर गोल्ड स्मगलर्स आणि सोन्याचा व्यापार करणारांनी आपली पद्धत बदलविली. त्यांनी ट्रेनचा वापर सुरू केला. ना तपासणीचे भय ना लुटले जाण्याचा धोका. असा सरळसाधा अनुभव असल्याने अलिकडे सोन्याचा व्यापार करणारे असो किंवा सोन्याची तस्करी करणारी मंडळी छान एसी डब्यात बसतात आणि राजरोसपणे कोट्यवधींचे सोने ईकडून तिकडे करतात.

गेल्या ४८ तासांत दोन तर दोन आठवड्यात तीन वेळा अशा घटना उघड झाल्या. पहिली घटना २९ सप्टेंबरला गरिब रथ एक्सप्रेसमध्ये घडली होती. मुंबईचा सराफा व्यापारी सागर पारेख याने कोट्यवधींचे सोने जबलपूरला नेले. दुरंतो एक्सप्रेसने परत येताना त्याने एक कट रचला आणि १ कोटी, ८२ लाख रुपयांचे सोने दरोडेखोरांनी लुटल्याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली. दुसरी घटना शनिवारी इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये उघड झाली. नरेश पंजवानी नामक व्यापाऱ्याकडून आरपीएफने ३ कोटी ३७ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे घबाड जप्त केेले. तर, रविवारी रात्री हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसमधून जळगावचे सराफा व्यापारी किशोर वर्मा (वय ४४, रा. गणपतिनगर) यांची २.११ कोटी रुपये किंमतीचे सोने चोरट्यांनी लंपास केले.

विशेष म्हणजे, कोट्यवधींचे सोने-चांदीचे दागिने रेल्वेतून सोबत नेताना व्यावसायिक किंवा तस्कर भलतेच बिनधास्त असल्याचे दिसून येते. हे घबाड ते एकटेच घेऊन ईकडून तिकडे लेवा देवा करतात. त्यांचा हा फंडा रेल्वेतील तपास यंत्रणांच्या नजरेत नाही कि जाणीवपूर्व त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित झाला आहे. मात्र, या घटनांमुळे आता रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
पुढील बातमी
वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनाचा शासनाची मंजुरी

संबंधित बातम्या