जिल्हा परिषद विशेष सभेसाठी १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सभापती पदे मिळावीत यासाठी शंभूराज देसाई - मकरंदआबा यांचीही जोरदार मोर्चेबांधणी

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३' च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

​सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आता सभापती पदाच्या निवडी शनिवार, ४ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहेत. मागील निवडीवेळी झालेला राजकीय गोंधळ आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे. हे आदेश शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, अधिकृत शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला १०० मीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

​दुसरीकडे, सभापती पदाच्या निवडीसाठी महायुतीच्या घटक पक्षांनी अत्यंत सावध भूमिका घेत आपली रणनीती आखली आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या सदस्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचेच सभापती होतील असा दावा सूत्रांकडून केला जात असला तरी, प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार महायुतीतील 'मोठा भाऊ' असलेल्या भाजपने मित्रपक्षांशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण या तीन मतदारसंघांतून किमान दोन सभापती पदांवर समर्थकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

​राष्ट्रवादीचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून, पाचपैकी किमान दोन सभापती पदे आपल्या गटाला मिळावीत यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या शासकीय ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने महायुतीचे सर्व नेते एकत्र आले होते, मात्र त्यावेळी राजकीय चर्चा टाळण्यात आली होती. प्रत्यक्ष सभेपूर्वी साताऱ्यात महायुतीच्या घटक पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत सभापती पदाचा पेच सुटणार की भाजप आपल्याच सदस्यांना संधी देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील खिंडवाडीत घराचे कुलूप तोडून तोडफोड; दोघांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
हनुमान जयंतीनिमित्त साताऱ्यात घुमला भीमरूपीचा गजर

संबंधित बातम्या