सातारा : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी 18 ऑगस्ट रोजी गोल बाग ते पालकमंत्री निवास रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना अपायकारक ठरणार्या डॉल्बीला विरोध हा या रॅलीचा संदेश असून यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले जाणार आहे.
समर्थ परिसर जेष्ठ नागरिक संस्था साताराचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सातारा शहरांमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच सातारा शहर पोलिसांनी एका मंडळाच्या डॉल्बीवर कारवाई करून डॉल्बीचा आग्रह धरणार्यांना एक प्रकारची तंबीच दिली आहे. मात्र सातारा शहरातील जेष्ठ नागरिक संघांनी डॉल्बी यंत्रणेचे दुष्परिणाम आणि त्याला विधायक मार्गाने करावयाचा विरोध या दृष्टीने त्यांनी मांडणी सुरू केली आहे. ही चळवळ नेटाने पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे. समाजमन बांधिलकीच्या दृष्टीने तयार करणे आणि गणराया सोहळा हा प्रबोधनात्मक आहे, हा संदेश देणे याकरता हि रॅली गांधी मैदान येथून काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता गोलबाग परिसरात जेष्ठ नागरिकांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही रॅली गोलबाग, राजपथ, देवी चौक, कमानी हौद, पोलीस करमणूक केंद्र, नगरपालिका रयत शिक्षण संस्था, विद्यार्थी संकुल सयाजीराव शाळा, मार्गे तेथून पालकमंत्री यांच्या कोयनादौलत बंगल्यावर जाऊन तिथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले जाणार आहे.
डॉल्बीवर बंदी घालू शकत नाही, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी पॉलिसी मॅटर म्हणून जनतेच्या भावना त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहेत. या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना, स्वातंत्र्यसंग्राम शिक्षण संस्था, क्रीडा असोसिएशन इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत. या रॅलीची पूर्वसूचना पालकमंत्री, पोलीस प्रशासनाला दिली जाणार आहे. सर्व स्तरातील ज्येष्ठ नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन विजय देशपांडे यांनी केले आहे.
डॉल्बीच्या विरोधात ज्येष्ठ नागरिकांची निघणाऱ रॅली
18 ऑगस्ट रोजी गांधी मैदानापासून होणार सुरुवात
by Team Satara Today | published on : 12 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा