सातारा : जिल्हा परिषदेच्या 65 गटासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नियोजन भवनात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अनुसूचित जाती 3, अनुसूचित जाती महिला 4, अनूसूचित जमाती 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 9, खुला 20, खुला महिला 20 असे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये वाठार किरोली गटातून भिमराव काका, कुडाळ गटातून दीपक पवार, म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे यांचे पत्ते कट झाले आहेत, तर देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार, राजू भोसले यांच्यासाठी गट सुरक्षीत ठरला आहे.
परंतु जिल्हा परिषद अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असल्याने 9 गटांमधून आता चुरस लागणार आहे. जिह्याच्या मिनी मंत्रालयाची आरक्षण सोडतीची प्रक्रिया नियोजन भवनात पार पडली. ही प्रक्रिया ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत निवडणूक शाखेने आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास सुरुवात केली. सुरुवातीला 57 चिठ्ठ्या करुन त्यातून अनुसूचित जातीच्या सात जागा काढण्यात आल्या. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 17 जागा ठरवण्यात आल्या आणि सगळ्यात शेवटी ओपन महिला आणि ओपन गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ओपन महिलांमध्ये ओझर्डे, तारळे, शेंद्रे, बिदाल, वारुंजी, कार्वे, कोपर्डे हवेली, आंधळी, मार्डी, वाठार किरोली, पुसेसावळी, एकंबे, मंद्रूळ कोळे, रेठरे बुद्रुक, हिंगणगाव, बावधन, काळंगाव, कुसुंबी, सातारारोड, अशी नावे पुकारताच इच्छूकांना आनंद झाला तर काहींची नाराजी झाली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात वाठार किलोरी गटातून भिमराव पाटील हे ज्येष्ठ म्हणून येत होते आता मात्र, त्यांच्या गटात महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे ते आता दिसणार नाही. तसेच जावली तालुक्यातील कुडाळ गट हा दीपक पवार यांचा हक्काचा गट समजला जातो. परंतु त्या गटाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण पडले असू त्यांचा पत्ता कट झाला असला तरीही तेथे थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छूकांची वर्णी लागू शकते. म्हसवे गट सुद्धा वसंतराव मानकुमरे यांच्यासाठी हक्काचा परंतु तेथेही नागरिकांचा मागास प्रवर्ग पडल्याने जर त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले तर ते पुन्हा जिल्हा परिषदेत दिसू शकतील, कुसुंबी गटातून सर्वसाधारण महिला असल्याने अर्चना रांजणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वर तालुक्यातून तळदेवमध्ये सर्वसाधारण असल्याने राजूशेठ राजपुरे, संजय गायकवाड यांच्यासाठी संधीच आहे. भिलारमधून मात्र अनूचित जातीचे आरक्षण पडल्याने तेथून नवा चेहराच समोर येण्याची शक्यता आहे. वाईमध्ये केवळ यशवंतनगर हे खुले आरक्षण असल्याने तेथे इच्छूकांची मोठी यादी असणार आहे. बावधन आणि ओझर्डे हे सर्वसाधारण महिला पडल्याने ज्यांनी तयारी चालवली होती त्यांना मात्र किंगमेकरचीच भूमिका बजावावी लागणार आहे. भुईजमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण झाले आहे. त्याचबरोबर पालमधून देवराज पाटील, मसूरमधून मानसिंगराव जगदाळे, पुसेसावळीमधून पुन्हा सुनिता धैर्यशील कदम यांच्यासाठी संधी आहे. त्याचबरोबर माणमधूनही मार्डीमधून पुन्हा भारती पोळ यांना संधी चालून आली आहे. तसेच परळीतून राजू भोसले यांच्यासाठीही संधी आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षाची संधी 9 ठिकाणी
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षीत असल्याने त्यात बुध, औंध, वाठार स्टेशन, कुडाळ, कोडोली, मल्हार पेठ, मारुल हवेली, खेड बुद्रूक, या 9 गटांना संधी मिळणार आहे.
17 पर्यंत हरकती दाखल करु शकता
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर दि. 17 पर्यंत हरकती दाखल करु शकता. त्यावर अभिप्राय करुन दि. 31 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गट आरक्षण
शिरवळ ना. मा. प्र.
भादे सर्वसाधारण
खेड बुद्रुक सर्वसाधारण
तरडगाव ना.मा.प्र.
साखरवाडी अनुसूचित जाती महिला
विडणी अनुसूचित जाती महिला
गुणवरे अनुसूचित जाती महिला
बरड अनुसूचित जाती
कोळकी सर्वसाधारण
वाठार निंबाळकर ना.मा. प्र.
हिंगणगाव सर्वसाधारण महिला
आंधळी सर्वसाधारण महिला
बिदाल सर्वसाधारण महिला
मार्डी सर्वसाधारण महिला
गोंदवले बुद्रुक अनुसूचित जाती महिला
कुकुडवाड सर्वसाधारण
बुध ना.मा. प्र. महिला
खटाव सर्वसाधारण
कातरखटाव सर्वसाधारण
निमसोड ना. मा. प्र.
औंध ना. मा. प्र. महिला
पुसेसावळी सर्वसाधारण महिला
मायणी ना. मा. प्र.
पिंपोडे बुद्रुक सर्वसाधारण
वाठार स्टेशन ना. मा. प्र. महिला
सातारा रोड सर्वसाधारण महिला
कुमठे सर्वसाधारण
एकंबे सर्वसाधारण महिला
वाठार किरोली सर्वसाधारण महिला
यशवंतनगर सर्वसाधारण
बावधन सर्वसाधारण महिला
ओझर्डे सर्वसाधारण महिला
भुईज ना. मा. प्रवर्ग
तळदेव सर्वसाधारण
भिलार अनुसूचित जमाती
म्हसवे ना. मा. प्र.
कुडाळ ना.मा.प्र. महिला
पुसुंबी सर्वसाधारण महिला
पाटखळ सर्वसाधारण महिला
लिंब सर्वसाधारण
खेड अनुसूचित जाती
कोडोली ना. मा. प्र. महिला
कारी सर्वसाधारण
शेंद्रे सर्वसाधारण महिला
वर्णे ना. मा. प्रवर्ग
नागठाणे सर्वसाधारण
गोकूळ तर्फ हेळवाक सर्वसाधारण
तारळे सर्वसाधारण महिला
म्हावशी सर्वसाधारण
मल्हार पेठ ना. मा. प्र. महिला
मारुल हवेली ना. मा. प्र. महिला
मंद्रूळकोळे सर्वसाधारण महिला
काळगाव सर्वसाधारण महिला
पाल सर्वसाधारण
उंब्रज सर्वसाधारण
मसूर सर्वसाधारण
कोपर्डे हवेली सर्वसाधारण महिला
सैदापूर अनुसूचित जाती
वारुंजी सर्वसाधारण महिला
तांबवे सर्वसाधारण
विंग ना.मा.प्र. महिला
कार्वे सर्वसाधारण महिला
रेठरे बुद्रुक सर्वसाधारण महिला
काले ना. मा. प्र. महिला
येळगाव सर्वसाधारण