सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांचा झेंडा ; नवोदय परीक्षेत साताऱ्याची राज्यात दमदार कामगिरी

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात आलेल्य नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये सातारा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 80 जागांपैकी तब्बल 55 जागांवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याने साताऱ्याने राज्यात आपला ठसा उमटवला आहे.

दरवर्षी केंद्र सरकारकडून जिल्हास्तरावर ही परीक्षा घेतली जाते. यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून सुमारे 11 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धात्मक परीक्षेत जिल्हा परिषद शाळांतील 55 विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय  क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथील पीएम श्री नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंत निवासी स्वरूपात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. हे शिक्षण CBSE बोर्डाशी संलग्न असून विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद साताऱ्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनं यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेले ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम, 5 वीचे नव्याने सुरू केलेले वर्ग, नियमित सराव, प्रश्नपेढी निर्मिती आणि गुणवत्ता वाढीसाठीचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.

या यशाबद्दल अनिस नायकवडी (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) यांनी सांगितले की, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद असून सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेचा साताऱ्यात मूकमोर्चा; जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
आंबेडकर युथ फोरमचे साताऱ्यात पोलखोल आंदोलन; सोनगाव डेपो प्रकरणातील अधिकारी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

संबंधित बातम्या