नवी दिल्ली : गेल्या 8 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
भारताच्या अटींवर सीमेवर शांतता राखण्यास पाकिस्तान तयार झाला आहे. पाकिस्तान आधीच आर्थिक अडचणीत असून, भारताच्या भूमिकेमुळे त्यांना आणखी त्रास होणार आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने चुकीच्या हरकती थांबवल्यास मदत मिळू शकते.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, "पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.". त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देत दोन्ही देशांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर गोळीबार थांबला असला, तरी पाकिस्तानसाठी दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारताने पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीचा वापर करत सिंधू जल करारावर कोणताही निर्णय घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. सिंधू जल करार सध्या स्थगितच राहणार आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो आपल्या अटींवर मान्य केला.
या संदर्भात, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे, सीमेवर शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव पाकिस्ताननेच दिला होता. पण, भारताने तो स्वीकारताना काही अटी घातल्या. त्या अटी पाकिस्तानला मान्य कराव्या लागल्या. सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले की, "हा काही दोन्ही बाजूंचा समझोता नाही, तर भारताच्या कणखर भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे. शस्त्रसंधी भारताच्या अटींवर झाली आणि सध्या सिंधू जल करारावर कोणतीही चर्चा होणार नाही." यावरून हे स्पष्ट होतं की, भारताने पाकिस्तानला मुत्सद्देगिरीच्या खेळात हरवले आहे.
आर्थिक आणि राजकीय अडचणींनी घेरलेल्या पाकिस्तानला आता पाण्यावरूनही मोठा फटका बसणार आहे. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानच्या शेतीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण, भारताने स्पष्ट सांगितलं आहे की, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्याला कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नये. तज्ज्ञांच्या मते, भारताचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.
भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, आता भारत नरमाईने घेणार नाही. मग तो सीमेवर शांतता राखण्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा, भारत आपल्या अटींवरच कायम राहणार आहे. आता पाहावं लागेल की, या मुत्सद्देगिरीच्या या फटक्यातून पाकिस्तान कसा सावरतो, की त्याच्या अडचणी आणखी वाढतात. भारताची ही भूमिका केवळ पाकिस्तानसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक संदेश आहे की, भारत आपल्या सार्वभौमत्वाशी आणि हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही.