सातारा-रहिमतपूर रस्त्यावर तरुणाला मारहाण करून दुचाकी पेटवली; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील उंबरे वस्ती परिसरातून दत्तनगरकडे जात असताना एका तरुणाला अडवून त्याला दगडाने मारहाण करण्यात आली आणि त्याच्या मित्राची दुचाकी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेम ऊर्फ बबलू विलास पार्टे (वय २५, रा. धनगरवाडी, सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी प्रेम पार्टे हा आपल्या मित्रासह उंबरे वस्तीमार्गे दत्तनगरकडे जात असताना संशयित विकी उंबरे याने त्याला रस्त्यात अडवले. यावेळी झालेल्या वादातून विकीने प्रेमच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर संशयितांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता या संशयितांनी प्रेमच्या मित्राची मोटारसायकलही पेटवून दिली.

​या प्रकरणी पोलिसांनी विकी उंबरे, अनिकेत उंबरे, रमाकांत उंबरे, दादा उंबरे, निखिल साळुंखे, राज पवार, कृष्णा उंबरे आणि कुणाल उंबरे (सर्व रा. कोडोली, सातारा) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सोनगाव परिसरातील घटना
पुढील बातमी
विमा कंपनीच्या कार्यालयात घुसून धमकी; सहा जणांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या