टीओडी मीटर ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी 58 लक्ष रूपयांच्या सवलतीचा लाभ

by Team Satara Today | published on : 16 September 2025


बारामती : बारामती परिमंडळ - महावितरणच्या टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वापरलेल्या विजेच्या युनिटसाठी 1 जुलै 2025 पासून प्रती युनिट 80 पैसे टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत लागू झाली आहे. टीओडी मीटर बसवलेल्या बारामती परिमंडळातील 4 लक्ष 49 हजार 268 ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या 72 लक्ष 92 हजार 718 वीज युनिटसाठी वीजबिलात 58 लक्ष 34 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.

महावितरणकडून राज्यात ग्राहकांना मोफत स्मार्ट टीओडी  मीटर बसविण्यात येत आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच 1 जुलै 2025 पासून दिवसाच्या वीज वापरामध्ये (टीओडी) प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये मार्च 2026 पर्यंत 80 पैसे, सन 2026-27 करिता 85 पैसे, सन 2027 ते 2029  करिता 90 पैसे तर सन 2029-30 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरु झाला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

नव्या तंत्रज्ञानामुळे मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. परिणामी मानवी हस्तक्षेप टळून अचूक बिले मिळणार आहेत. तसेच घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा आर्थिक लाभ होणार आहे.      

बारामती मंडळातील  75 हजार 59 ग्राहकांना  जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या 12 लक्ष 41 हजार 684 वीज युनिटसाठी वीजबिलात 9 लक्ष 93 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे.सातारा मंडळातील  1 लक्ष 55 हजार 896 ग्राहकांना  जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या 21 लक्ष 75 हजार 599 वीज युनिटसाठी वीजबिलात 17 लक्ष 40 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. सोलापूर मंडळातील  2 लक्ष 18 हजार 313 ग्राहकांना  जुलै व ऑगस्ट महिन्यात वापरलेल्या 38 लक्ष 75 हजार 435 वीज युनिटसाठी वीजबिलात 31 लक्ष रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर
पुढील बातमी
विना परवाना जनावरांची वाहतूक करणारा ट्रक व १६ जनावरे पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या