सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याचा ई-मेल

सातारा पोलीस यंत्रणा इन ऍक्शन; शासकीय इमारतीची कसून झडती

by Team Satara Today | published on : 21 May 2025


सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी सव्वातीन वाजता उडून देणार, असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. बुधवारी सातारा पोलिसांनी तातडीने ऍक्शन मोडवर येत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह परिसरातील सर्व इमारती तातडीने रिकाम्या केल्या. या सर्व इमारतींची बॉम्ब डिटेक्शन स्क्वाड आणि श्वान पथकाच्या माध्यमातून कसून तपासणी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काहीही आढळून आले नाही. याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. 

दुपारी एक वाजल्यापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला मॉक ड्रिल असल्याचे सर्वांनाच वाटले. मात्र बीडीएस यंत्रणा अत्यंत शीघ्र गतीने आरसीपी पथकासह दाखल झाल्याने प्रसंगाचे गांभीर्य वाढले. याबाबतचा ई-मेल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आली. बुधवारी हॉट मेलवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्स ने उडवणार असल्याची माहिती अज्ञाताकडून ईमेलवर देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सातारा पोलिसांनी तात्काळ बीडीएस, आरसीपी व श्वान पथक या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला. तब्बल 120 कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व परिसर तातडीने सील करण्यात येऊन प्रत्येक इमारतीची कसून तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कलेक्टर ऑफिस मधील सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने पुनर्वसन कार्यालय, गेस्ट हाऊस, जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत, नियोजन भवन, प्रशासनाची मुख्य इमारत या सर्वच ठिकाणी कसून तपासणी केली. 

सुमारे एक तास ही तपासणी सुरू होती. या तपासणी प्रक्रियेमध्येच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अशातच सातारा पोलिसांचे येथील शिवाजी महाविद्यालयावर मॉकड्रिल सुरू होते. कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा हा रंगीत तालमीचा भाग असावा, अशी शक्यता वाटल्याने प्रसार माध्यमे सुद्धा नेहमीच्या सरावाने तयार होती. मात्र खरोखर धमकीचा ई-मेल आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सुद्धा या संदर्भात माहिती देताना तपासाचा भाग म्हणून बर्‍याचशा गोष्टी सांगायचे कटाक्षाने टाळले. ई-मेल नक्की कोठून आला, त्याचा आयपी ऍड्रेस शोधण्यासाठी सायबर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
पुढील बातमी
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पोलिसांची बॉम्ब शोधण्याची प्रात्यक्षिके

संबंधित बातम्या