जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ऐतिहासिक पाटेश्वर ट्रेक; यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा :  येथील यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ऐतिहासिक पाटेश्वर मंदिर संकुल येथे वारसा ट्रेक आयोजित करण्यात आला. या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर वास्तुविशारद, प्राध्यापक, वारसा विषयक अभ्यासक आणि स्थानिक समुदायातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त आर्किटेक्ट स्वराली सगरे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स सेंटरचे अध्यक्ष आर्किटेक्ट विपुल सालवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत वारसा जतन व संवर्धनासाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. ट्रेकदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी स्केचिंग, फोटोग्राफी आणि प्रत्यक्ष स्थळ अवलोकनाच्या माध्यमातून निसर्ग, वास्तुरचना आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील नाते अनुभवले.

हा उपक्रम यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य आर्किटेक्ट सुहास तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा वारसा ट्रेक डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, इंडियन नेशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चरल हेरिटेज पुणे चॅप्टरचे आर्किटेक्ट सौरभ मराठे यांनी मार्गदर्शित केला. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे सहभागी विद्यार्थ्यांना पाटेश्वर येथील शैलगृह, शतकानुशतके जुनी शिल्पकला आणि विस्तीर्ण मंदिर समूह यांचे वास्तुशिल्पीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक सखोलपणे समजले. या प्राचीन वास्तू प्रादेशिक इतिहासाच्या विविध थरांची साक्ष देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सहभागींसाठी हा ट्रेक केवळ सहल न राहता एक जिवंत वारसा अनुभव ठरला. दगडात कोरलेल्या इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याचे सर्जनशील पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
औंध पोलिसांची कामगिरी; महिलेच्या गळ्यातील बोरमाळ चोरट्यास अटक, संशयित सांगली जिल्ह्यातील
पुढील बातमी
संविधानाचा अनादर महागात पडेल; संविधानाचे पालन म्हणजे देशाच्या उन्नतीची हमी

संबंधित बातम्या