महाबळेश्वर पाठोपाठ दिवाळी हंगामासाठी सज्जनगड, कास, बामणोली परिसर बहरणार

स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पर्यटकांसाठी अंथरल्या पायघड्या

by Team Satara Today | published on : 21 October 2025


सातारा: वर्षातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या पर्वाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून हा सण साजरा करण्यासाठी अनेकांनी महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिले आहे. उद्या बुधवारी भाऊबीज साजरी झाल्यानंतर महाबळेश्वर पाठोपाठ दिवाळी हंगामासाठी सज्जनगड, कास, बामणोली, तापोळा ही पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून जाणार असल्याने स्थानिक  नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पर्यटकांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत.

दिवाळी हंगामात पर्यटकांनी महाबळेश्वर भरले असून वेण्णालेकसह वेगवेगळ्या पॉईंटवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. महाबळेश्वरची संपूर्ण बाजारपेठेत गेल्या दोन दिवसापासून पर्यटकांनी  खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे. दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील हॉटेल, लॉज हाऊसफूल झाल्याचे चित्र आहे.

उद्या दि.२२ ऑक्टोंबर रोजी भाऊबीज साजरी झाल्यानंतर पर्यटक भटकंतीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. कोकणातील लांब पल्ल्याचा प्रवास आणि तेथील गर्दी पाहता सातारासह परिसरातील जिल्ह्यातील नागरिक सज्जनगड, कास पठार, बामणोली, तापोळा, वासोटा किल्ला, नागेश्वरी या ठिकाणांना पर्यटनासाठी पसंती देतात. पर्यटक कास पठार येथील फुलांचा हंगाम पाहण्यासाठी जात असतात. या पठारावरील विविध दुर्मिळ जातीचे फुले, पावसाचा शिडकावा आणि धुक्यांची झालरीमध्ये स्वतःला झोकून देत अनेक पर्यटक मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळते. कास पठारावरील फुलांचा अंतिम टप्प्यात हंगाम असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढू लागली असून त्यामुळे स्थानिक वस्तू विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बामणोली आणि तापोळा येथील शिवसागर पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. शिवसागर जलाशयामध्ये लॉन्च, स्पीड बोट यामध्ये बसून पर्यटनाचा आनंद घेणे ही एक वेगळी पर्वणी ठरते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही अटी व शर्तीच्या अधीन राहून पर्यटकांना वासोटा किल्ला आणि नागेश्वरी येथे दर्शनासाठी जाण्यास वन विभागाकडून रितसर परवानगी दिली जाते. त्यामुळे दिवाळीची सुट्टी ही गिर्यारोहकांसाठी एक पर्वणी ठरते. नागेश्वरी येथील डोंगर उतरून खाली कोकणात खेड येथे जाता येते. त्यामुळे अनेक पर्यटक वासोटा किल्ला नागेश्वरी येथे भेट देऊन पुढील पर्यटनासाठी कोकणात जाण्यास प्राधान्य देतात. कांदाटी खोऱ्यात चकदेव हे सुद्धा एक उंचावरील ठिकाण समजले जाते. येथूनही खाली लोखंडी शिड्यावरून उतरून कोकणात उतरता येते. त्यामुळे या ठिकाणीही पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. एकूणच महाबळेश्वरनंतर आता उद्यापासून सज्जनगड, बामणोली, कास पठार, तापोळा, वासोटा किल्ला आणि नागेश्वरी पर्यटकांनी गजबजून जाणार असल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

संबंधित बातम्या