सातारा : शिवथर (ता. सातारा) येथील महालक्ष्मी मंदिर कोणतीही परवानगी न घेता पाडण्यात आले आहे. या मंदिराचे सागवानी लाकूड, जुने दगड यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणेने या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवथर येथील ग्रामस्थ किरण विष्णू साबळे व संदीप विष्णू साबळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
साबळे म्हणाले की, महालक्ष्मी मंदिर हे पुरातन होते. भिकू रामा गुरव यांच्या नावावर हे मंदिर होते. मात्र, ते मयत आहेत. असे असताना या मंदिराशी संबंध नसलेल्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे मंदिर पाडले. तसेच जागा मोजणीसाठी नगरभूपान विभागाकडे अर्ज केलेला आहे. तसेच खासगी मोजणीही करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय दबावाचा वापर करुन हे मंदिर पाडण्यात आले.
वास्तविक, शासकीय मोजणी केल्यानंतर हे मंदिर पाडायला हवे होते. असे झालेले नाही. काही लोकांना आपल्या स्वार्थासाठी मंदिराची जागा वापरायची आहे, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, असेही साबळे यांनी यावेळी सांगितले.