भारत बंद पाठोपाठ आता महाराष्ट्र बंद

आहार संघटनेकडून बंद ची हाक

by Team Satara Today | published on : 12 July 2025


मुंबई : दोन दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आता येत्या १४ जुलैला ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच आहार संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आहार संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘महाराष्ट्र बंद’बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. “१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंदच राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड करवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.

दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५% वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६०% ची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे.हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (AHAR) कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो.चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया – आता पुरे झाले!” असेही या संघटनेने म्हटले आहे.

राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) अर्थात ‘आहार’ संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. “ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे.या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदचा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन
पुढील बातमी
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संबंधित बातम्या