सातारा : हाऊस क्लिनिंग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे वाईमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर साताऱ्यात रहीमतपूर फाट्याजवळ आणून त्यांना बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात चाैघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २७ रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यातील काही संशयित महाबळेश्वर येथील असल्याचे समोर येत आहे.
याबाबत व्यावसायिक महेश तानाजी जाधव (वय ३७, मूळ रा. उत्तरेश्वर पेठ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाई येथील एसटी स्टँड येथून संशयितांनी मला काळ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने बसविले. सातारा येथील रहिमतपूर फाट्याजवळ नेण्यात आले. तेथे गाडी थांबविल्यानंतर चाैघांनी मला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत नेले.
तेथे मला कमरेच्या पट्ट्याने, हातातील कड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली, तसेच माझ्याकडून जबरदस्तीने गुगल-पेद्वारे हाॅटेलचे ५४०० रुपयांचे बिल, तसेच पेट्रोलसाठी ४५०० रुपये घेतले, अशी तक्रार त्यांनी केली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणातून घडला, याची पोलिस माहिती घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज अधिक तपास करीत आहेत.