ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार, तर मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव

by Team Satara Today | published on : 28 February 2026


नाशिक  : गेली काही दशके मराठीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीदेखील मायमराठीची सेवा करण्यासाठी पुढे येत असल्याने मराठी वैभवाचा रथ असाच पुढे जाईल आणि मराठी सारस्वत मराठी भाषेच्या लौकीकात आणखी भर घालतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठीच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तिंना पुरस्कार प्रदान केल्याने पुरस्कारांचे महत्व आणि महात्म्य वाढले आहे, असेही गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणातील कविवर्य कुसुमाग्रज नगरीत आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.   

शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांनी देशातील हजारो तरुणांपर्यंत आध्यात्माचा गोडवा पोहोचविला. त्यांना पुरस्कार प्रदान करतांना धन्यतेची भावना मनात आहे. त्यांचे व्यक्तिमत्व कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. भालचंद्र नेमाडेंनी मानवी जीवन आणि मानवी संवेदनांची गुंतागुंत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेला नवे पंख दिले. श्रीनिवास कुलकर्णी यांनी संवेदनशील आणि विचारप्रधान लेखन केले. डॉ.दिलीप धोंडगे यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर पीएचडी करून ग्रंथ लिहिले. आपटे वाचन मंदिराने 70 हजारहून अधिक ग्रंथ आणि हस्तलिखितांचे जतन केले. विनोद कुलकर्णी यांनी मराठी अभिजात भाषा व्हावी यासाठी लाखो पत्र लिहून घेतली. कर्नाटक साहित्य परिषदेने महाराष्ट्राबाहेर मराठीला मान मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव केला.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी सहा- सात दशके मराठी भाषेची सेवा केली आहे. याच्यासोबत तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेची सेवा घडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आपल्या सगळ्यांना मराठी असण्याचा आणि मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी माणसाने केलेल्या  उत्तुंग कार्याचाही सर्वांना अभिमान आहे. हा अभिमान साजरा करण्यासाठीच मराठी विश्व संमेलन आयोजित करण्यात येते. मराठी भाषेचा गौरव जगभरात पोहोचविण्याचे शासनाचे प्रयत्न असून पुढील वर्षीचे विश्व मराठी संमेलन विदर्भात आयोजित करावे, त्यानंतरचे विश्व मराठी संमेलन परदेशात करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  केली.  

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,  मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, खासदार राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मराठी भाषा दिनानिमित्त २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, श्री.पु.भागवत पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेस, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंडगे आणि आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला सन्मानित करण्यात आले, तसेच २०२४ चे स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते २०२४ च्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रकारातील प्रौढ वाङ्मय (२२), बाल वाङ्मय (६), प्रथम प्रकाशन (६), सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (१) असे एकूण ३५ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींची नावे अशी (अनुक्रमे प्रौढ वाङ्मय प्रकार, पुरस्कार, लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव, प्रकाशन संस्थेचे नाव या क्रमाने) : काव्य, कवी केशवसुत पुरस्कार, सुनीता डागा, तुझं शहर हजारो मैलांवर, हस्ताक्षर प्राकशन गृह, नांदेड. नाटक/एकांकिका, राम गणेश गडकरी पुरस्कार, गणपत गायकवाड, रायगडावरून राजगृहाकडे, संकेत प्रकाशन, नागपूर. कांदबरी, हरी नारायण आपटे पुरस्कार, हिनाकौसर खान, इत्रनामा, रोहन प्रकाशन पुणे. लघुकथा, दिवाकर कृष्ण पुरस्कार, डॉ. पद्मनाभ केसकर, हॅल्युसिनेशन्स, सुनिधी पब्लिशर्स, पुणे. ललित गद्य (ललित विज्ञानासह), अनंत काणेकर पुरस्कार, सानिया, काही आत्मिक…काही सामाजिक, रोहन प्रकाशन, पुणे. विनोद, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, सारिका कुलकर्णी, बे दुणे पाच !, ग्रंथाली मुंबई. चरित्र, न. चिं. केळकर पुरस्कार, मृणालिनी चितळे, निलू निरंजना : गोष्ट हिची पृथ्वी मोलाची, कृष्णा पब्लिकेशन्स, पुणे. आत्मचरित्र, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, युनूस सय्यद, इनुची गोष्ट, न्यू इरा पब्लिकेशन्स हाऊस, पुणे. समीक्षा/वाड्मयीन संशोधन, सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन, श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, विनय नारकर, वस्त्रगाथा, राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे. इतिहास, शाहू महाराज पुरस्कार, मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी, अपराजिता गाथा विरांगनांची, मिहाना पब्लिकेशन्स, पुणे. भाषा शास्त्र/व्याकरण, नरहर कुरुंदकर पुरस्कार, सलिल वाघमारे, मराठी भाषा : लेखन- मार्गदर्शन, ग्रंथाली, मुंबई. विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह), महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे, कल्पनेचा काजवा, मिहाना पब्लिकेशन्स, पुणे. शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह, वसंतराव नाईक पुरस्कार, मयूर बागूल, सर्जक, चपराक प्रकाशन, पुणे. उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नवबौद्ध इत्यादी), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. सिल्केशा अहिरे, शांताबाई दाणी- भीम मळ्यातील सूर्यफूल, साई ज्योती पब्लिकेशन, नागपूर. अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखन, सी. डी. देशमुख पुरस्कार, अभिजित जोग, ब्रॅण्डनामा २.०, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. पुणे. तत्त्वज्ञान व मानसशास्त्र, ना. गो. नांदापूरकर पुरस्कार, वसु भारद्वाज, भारतीय तत्त्वज्ञान स्वरूप आणि सिद्धांत, विद्या बुक्स पब्लिशर्स, छत्रपती संभाजीनगर. शिक्षणशास्त्र, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, स्मिता गौड, माझे शाळेतले प्रयोग, राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे. पर्यावरण, डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, संतोष शिंत्रे, पैस पर्यावरण संवादाचा, मनोविकास प्रकाशन, पुणे. संपादित/आधारित, रा. ना. चव्हाण पुरस्कार, संपादक प्रफुल्ल शिलेदार, अरुण कोल्हटकर, मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे. अनुवादित, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, अनुवादक मेघना भुस्कुटे, भारतीय भाषांची अनोखी कहाणी, मनोविकास प्रकाशन, पुणे. संर्कीण (क्रीडासह), भाई माधवराव बागल पुरस्कार, भानु काळे, अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त, मौज प्रकाशन गृह, मुंबई. सर्व पुरस्कारांची रक्कम एक लाख रुपये. 

बाल वाङ्मय पुरस्कार : कविता, बालकवी पुरस्कार, अशोक कोतवाल, गाऊ आनंदाचे गाणे, अष्टगंध प्रकाशन, ठाणे. नाटक व एकांकिका, भा. रा. भागवत पुरस्कार, जयेश मेस्त्री, जादूचा दिवा, व्यास पब्लिकेशन, ठाणे. कादंबरी, सानेगुरुजी पुरस्कार, सुरेश वांदिले, १६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब…!, राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे. कथा (छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथासंग्रह), राजा मंगळवेढेकर पुरस्कार, जितेंद्र कुवर, चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर. सर्वसामान्य ज्ञान, यदुनाथ थत्ते पुरस्कार, डॉ. उमेश करंबळेकर, चारा खा, पाणी प्या अन् भुर्र s s s, राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे. संकीर्ण, ना. धो. ताम्हणकर पुरस्कार, पृथ्वीराज तौर, हाक शांततेसाठी, हस्ताक्षर प्रकाशनगृह, नांदेड. सर्व पुरस्कारांची रक्कम रुपये ५० हजार आहे. 

प्रथम प्रकाशन पुरस्कार : काव्य, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, सचिन शिंदे, पातीवरल्या बाया, अष्टगंध प्रकाशन, ठाणे. कादंबरी, श्री. ना. पेंडसे पुरस्कार, अलका मोकाशी, गुंतवळ, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे. लघुकथा, ग. ल. ठोकळ पुरस्कार, विजय शिरसाट, दिव्याखालचा दिवा, समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर. ललित गद्य, ताराबाई शिंदे पुरस्कार, ऋतुराज कशेळकर, कलंदर- बिलंदर, शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक. समीक्षा सौंदर्यशास्त्र, रा. भा. पाटणकर पुरस्कार, महेश शेट्ये, जी. ए. : द लॉस्ट पॅराडाइज, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. सर्व पुरस्कारांची रक्कम रुपये ५० हजार. 

*सरफोजी राजे भोसले, बृहन्महाराष्ट्र पुरस्कार, सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार, प्रा. डॉ. शुभदा शहा, घाल घाल पिंगा वाऱ्या…, ओमेगा पब्लिकेशन्स, बेळगाव पुरस्काराची रक्कम रुपये एक लाख मात्र.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखवला हिरवा झेंडा
पुढील बातमी
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आपलं मंत्रालय'च्या विशेषांकाचे प्रकाशन

संबंधित बातम्या