शाहूपुरी, गोडोलीत घरफोड्यांचे सत्र; सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

by Team Satara Today | published on : 29 October 2025


सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी व गोडोली येथे चोरट्यांनी उच्छाद घालत घरफोड्यांचे सत्र राबवले. साडेसहा तोळे वजनाच्या सोन्‍या-चांदीच्या दागिन्‍यांसह सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथील घरफोडी प्रकरणी स्‍वप्‍नील दिलीप कुलकर्णी (वय ३८, रा. सिध्दीविनायक सोसायटी, शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. २७ ऑक्‍टोबर रोजी घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पहिल्‍या मजल्‍यावरुन प्रवेश करत कपाटातील सोन्‍याचा ऐवज लंपास केला. यामध्ये चोरट्यांनी १० ग्रॅमची सोन्‍याची चेन, साडेचार ग्रॅमचे झुबे, ३ ग्रॅमचे टॉप्‍स, साडेचार ग्रॅमच्या सोन्‍याच्या साखळ्या, साडेचार ग्रॅमचे सोन्‍याचे वेल, १५ ग्रॅमची सोन्‍याची माळ, १५ ग्रॅमची अष्टपैलू सोन्‍याची माळ, ५ ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅमचे बदाम, चांदीमध्ये अत्तरदानी, गुलाबदानी, निरांजन, कोयरी, छाेट्या वाट्या, रोख ७७४० रुपये तसेच ठेव पावत्‍या, कादगपत्रे असा मुद्देमाल चोरी झाला आहे. १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा हा ऐवज असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करीत आहेत

गाेडोली येथील चोरी प्रकरणी दुसरी तक्रार विक्रम बाळू यादव (वय ३८, रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी दि. २८ ऑक्‍टाेबर रोजी त्‍यांची मोबाइल शॉपी व भावाचे किराणा दुकान फोडले आहे. त्‍यातून चोरट्यांनी मोबाइलसह किराणा दुकानातील साहित्‍य असे एकूण ३१ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. सुधीर पवार यांचा १०१ किलोमीटर धावण्याचा पराक्रम; सलग १२ तास २५ मिनिटांत धावले सातारा- मेढा- सातारा अंतर
पुढील बातमी
कृष्णा नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीला वाचविले; पोलीस कर्मचारी संताजी माने यांची कर्तव्यदक्षता

संबंधित बातम्या