सातारा पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा राजवाडा येथून शुभारंभ; संत गाडगेबाबा जयंती निमित्त पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू

by Team Satara Today | published on : 23 February 2026


सातारा  : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने सखोल स्वच्छता अभियानाचा सोमवारपासून राजवाडा येथून शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे व सर्व सभापतींच्या उपस्थितीत या स्वच्छता अभियानाचा नारळ फोडण्यात आला. केवळ शुभारंभ नव्हेच तर सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वतः रस्ते झाडून काढण्यास सफाई कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

या स्वच्छता अभियानाची सुरुवात शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या महादरे परिसरातून करण्यात आली. तत्पूर्वी या कार्यक्रमाची जाहीर घोषणा आणि प्रत्यक्ष सुरुवात याचा छोटे खाणी कार्यक्रम सातारा शहर राजवाडा बस स्थानकावर आखण्यात आला होता. नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष अड. दत्ता बनकर आरोग्य सभापती धनंजय जांभळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, सभापती अशोक शेडगे,  महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, शिक्षण सभापती शंकर कीर्दत,आरोग्य विभागाचे प्रमुख राकेश गलीयल तसेच एस. के. जाधव,सातारा पालिकेचे सर्व मुकादम आणि तब्बल 280 स्वच्छता कर्मचारी या स्वच्छता अभियानाला उपस्थित होते.

या स्वच्छता मोहिमेला नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आपल्या मनोगत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सातारा शहर आणि त्याची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे.  सातारा नगरपालिका आणि सातारा नागरिक यांनी समन्वय आणि शहर स्वच्छतेचे वेगळे मापदंड तयार करावयाचे आहेत. माझी वसुंधरा अभियानामध्ये सातारा पालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.  त्याच पद्धतीने आपले शहर स्वच्छ ठेवत आणि सार्वजनिक आरोग्य जपू अशी अपेक्षा अमोल मोहिते यांनी व्यक्त केली. 

दत्ता बनकर म्हणाले, सातारा शहर सातारा शहरातील नागरिक सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने सातत्याने अशा स्वरूपाच्या स्वच्छता मोहिमा लोकसहभाग निश्चित वाढवतील या लोकसभागातूनच स्वच्छतेसह लोककल्याणाची मोठी कामे पार पाडली जातील. संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा विचार कृतीतून अमलात आणला पाहिजे हा संदेश सातारा पालिकेने या निमित्ताने दिला आहे याबद्दल त्यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.

या मोहिमेची माहिती देताना आरोग्य सभापती धनंजय जांभळे म्हणाले, सातारा नगरपालिका संपूर्ण २५ प्रभाग तसेच हद्दवाढ क्षेत्रालगतचा संपूर्ण परिसर दररोज सखोल स्वच्छता मोहिमा अभियान राबवून स्वच्छ करणार आहे. तसेच सातारा शहरातील नगरपालिकेच्या मालकीची काही शौचालयसुद्धा काही कारणास्तव बंद होती.  ती खुली करण्यात येऊन त्यांची स्वच्छता कचरा संकलन करणे या सेवेमध्ये सुलभता आणणे आणि कचऱ्याचे शास्त्रीय विल्हेवाट लावणे याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुद्धा घेतले जाणार आहे. संत गाडगेबाबा यांच्या हातातील खराटा हा स्वच्छतेचा संदेश होता सातारा नगरपालिका या जयंतीनिमित्त पुढील 365 दिवस याच पद्धतीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
त्रिपुटीतील एकाला बेदम मारहाण; तीन जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल
पुढील बातमी
सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून नांदगाव येथे कृष्णा नदी पात्र कोरडे पाडण्याचा प्रयत्न ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

संबंधित बातम्या