पुसेगावमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ चा थरार; दोघां दुचाकीस्वारांना ओमनीने उडवले

दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 September 2025


सातारा : पुसेगावहून फलटणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महाराजा मंगल कार्यालयाजवळ ओमनी कार चालवणाऱ्या एकाने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली, या धडकेमध्ये दुचाकीस्वार अक्षरशः रस्त्याच्या बाजूला उडून पडले. अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून, ओमनी चालकावर दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आज दि. २७ रोजी दुपारी, सचिन दिलीप घोरपडे (वय ३२,  रा. वर्धनगड ता. खटाव) हा आपली ओमनी कार (क्र. एम एच ११ सी जी १५८०)   घेऊन पुसेगाव बाजूकडून फलटणबाजूकडे जात होता. 

पुसेगाव येथील महाराजा मंगल कार्यालय समोर तो वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने बेदकारपणे आपली ओमिनी कार चालवत होता. यावेळी पुसेगाव बाजू कडून फलटणकडे निघालेल्या एका दुचाकीस त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला अक्षरशः उडून पडले. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली नाही. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी मध्यधुंद अवस्थेतील ओमनी कार चालकास ताब्यात घेऊन त्याला तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. 

यावेळी पोलिसांनी येथील रुग्णालयात त्याची तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पुसेगाव पोलिसांनी स्वतः सुमोटो घेत त्याच्यावर मद्यप्राशन करून बेदकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनी. पोमण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील घरांचे दिवाळीत वाटप
पुढील बातमी
राज्यात पुढील ६ दिवस धोक्याचे? मुसळधार पावसाचा इशारा

संबंधित बातम्या