सातारा : सातारा लोणंद रस्त्यावर वाढे-पाटखळ माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला वासोळे गावातील कण्हेर धरणाचा डावा कालवा मध्यरात्री अचानक फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेमुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्मशानभूमीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे.
कालवा फुटताच पाण्याचा जोरदार प्रवाह शेतांमध्ये शिरला. उभ्या पिकांना तडाखा बसला असून काही शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याचा मोठा अपव्यय झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच या कालव्याला गळती लागल्याचा प्रकार ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कालव्याच्या दुरुस्ती व देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.