सातारा : येथील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात आजच्या संस्कार वर्गाचे सुरुवातीस प्राणायाम, नामस्मरण, आईवडील व निसर्गाची मानसपूजा या प्रारंभीच्या संस्कार विधीनंतर गत आठवड्यातील ठळक घडामोडींचा(अमेरिका-इस्राईल विरुद्ध इराण युद्ध व महाराष्ट्रातील भोंदूगिरीचे प्रकरण) आढावा घेण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. याप्रसंगी अंधश्रद्धेच्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच निदान भविष्यात तरी अशा प्रवृत्तींची वाढ होऊ नये यासाठी शालेय स्तरावर जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे हे ओळखून आजच्या संस्कार वर्गाचा समारोप करताना बालमित्रांना "आमच्या आयुष्यात कितीही जटील समस्या, कठीण प्रसंग आले तरी या सर्व संकटांचा सामना आम्ही खंबीरपणे करु परंतु,अंधश्रद्धेला कधीच शरण जाणार नाही.अपप्रवृत्तींच्या पायावर आमचे मस्तक कदापि ठेवणार नाही." अशी शपथ दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघाचे अध्यक्ष भारत भोसले म्हणाले, सद्यस्थितीत आणि भूतकाळातही अंधश्रद्धेतून घडत असलेले अघोरी प्रकार,अनैतिक कृत्ये व या भोंदूगिरीस बळी पडलेल्या सर्वसामान्य महिला तसेच अनेक क्षेत्रातील नागरिक पाहता अंधश्रद्धेच्या या वाळवीने समाज किती खोलवर पोखरला गेला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते.यामागील कारणे अभ्यासता अतिलोभ, माया,मोह,मत्सर, द्वेष तसेच आयुष्यात आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मिळविण्याचा मानवी हव्यासच या भोंदूगिरीच्या अपप्रवृत्ती फोफावण्यास कारणीभूत ठरत असून खरे तर अशाश्वत सुखाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा समाजाने या सुधारित विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रथम स्वत:ला ओळखून आयुष्याच्या कठीण काळात स्व-सामर्थ्यावर जास्त विश्वास ठेवायला शिकणे गरजेचे आहे.आपल्या जीवनात येणा-या सर्व संकटांचा सामना आपणच करायचा असतो.यासाठी कोणत्याही भोंदूने दिलेला गंडा-दोरा,धुपारा-अंगारा,होम-वहन विधी किंवा नरबळी,पशुबळीसारखी अघोरी कृत्ये आपल्या संकटावरील समाधान नसून या मार्गावर चालल्याने केवळ निराशाच पदरी पडते.
या चुकीच्या प्रवृत्तीच्या पायावर डोके ठेवण्यापेक्षा येईल त्या परिस्थितीला निर्धाराने सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ असून एकवेळ सत्ता,संपत्ती,नावलौकिक आदी भौतिक सुखे नाही मिळाली तरी चालतील, तुम्ही शून्य राहिलात तरी चालेल, वेळ आलीच तर भिक्षापात्र हाती धरणे पसंत करा. परंतु,अशा अघोरी,अविचारी,दुराचारी प्रवृत्तींना कदापिही शरण जाऊ नका.खोट्या सुखाच्या लालसेने त्यांचेपुढे लाचार होऊन हात पसरणे,स्वत:चा मेंदू,बुद्धीमत्ता गहाण ठेवून या फसव्या वृत्तीच्या स्वाधीन होत त्यांना सर्वस्व अर्पण करणे म्हणजे अंधश्रद्धेच्या प्रसाराला हातभार लावणे असा होईल.त्यामुळेच भविष्यात अशा कोणत्याच गैरकृत्यात सामील न होण्याचे आवाहन यावेळी केले.